अहिल्यानगर MIDC परिसरात डिझल-बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; स्वयंचलित पंपाने काही मिनिटांत शेकडो लिटर डिझल लंपास!
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर एमआयडीसी व परिसरात सध्या डिझल, ट्रक-बॅटरी आणि स्टेफनी चोरी करणारी संघटित टोळी सक्रिय झाल्याने व्यावसायिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही टोळी उभी असलेली अवजड वाहने लक्ष्य करत असून, काहीच मिनिटांत ट्रक व कंटेनरमधील शेकडो लिटर डिझल चोरी करून पसार होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडे स्वतःचे वाहन असून, डिझल चोरीसाठी स्वयंचलित पंप यंत्रणा वापरली जात आहे. त्यामुळे डिझल काढताना कुठलाही पसारा न होता चोरी अगदी सफाईदारपणे केली जात आहे. आजवर MIDC परिसरात अनेक ट्रक चालक व उद्योजकांच्या वाहनांमधील बॅटऱ्या, स्टेफन्या आणि मोठ्या प्रमाणात डिझल चोरीस गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या प्रकरणी अनेक व्यावसायिकांनी व वाहनधारकांनी संबंधित पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्यापही या टोळीविरोधात ठोस व विशेष कारवाई झाल्याचे चित्र दिसून येत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
डिझल चोरीमुळे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय वाहन रस्त्यात बंद पडण्याचे, अपघात होण्याचे धोकेही वाढले आहेत. “रात्रभर वाहन उभे करणे म्हणजे जुगार झाला आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक ट्रक चालकांनी व्यक्त केली आहे.
व्यावसायिकांनी MIDC परिसरात रात्री गस्त वाढवावी, सीसीटीव्ही तपासणी करावी व संशयित वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात आला आहे.