सातपुड्यातील होळी : ज्वाळांतून उजळणारी समरसतेची परंपरा
होळीची चाहूल, पूर्वतयारी आणि आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन
सातपुड्यातील होळी : ज्वाळांतून उजळणारी समरसतेची परंपरा
होळीची चाहूल, पूर्वतयारी आणि आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन
अमळनेर प्रतिनिधी
होळीची चाहूल व पूर्वतयारी
फाल्गून महिना सुरू होताच सातपुड्याच्या रांगांमध्ये एक वेगळाच उत्साह दाटून येतो. आदिवासींच्या पाड्यापाड्यांवर आनंदाचे वारे वाहू लागतात. फाल्गून पौर्णिमेला होळी प्रज्वलित होणार, याची चाहूल लागताच अंकलेश्वर, डेडियापाडा, अमलीबारी, मोलगी, काठी, वैजापूर, करजाणे, देवझिरी, लंगडाआंबा, शिरवेल, पाल, बर्हाणपूर अशा विस्तीर्ण परिसरात तयारीला वेग येतो.
नवीन कपड्यांची शिवण सुरू होते. चांदीचे दागिने खरेदी केले जातात. ढोल-ताशांच्या चामड्यांची दुरुस्ती केली जाते. ग्रामदैवतांना नवस बोलले जातात. घरांच्या भिंतींना रंगरंगोटी चढते. रोजगारासाठी दूर गेलेले तरुण आपल्या पाड्यावर परततात. मोरपिसांनी सजविलेल्या टोप्या तयार होतात. सातपुड्याच्या रांगांमध्ये ढोलांचे नाद घुमू लागतात. जसे रामायणात श्रीराम केंद्रस्थानी, तसे आदिवासी जीवनात होळी केंद्रस्थानी!
---
होळीची नांदी : निसर्गाशी नाते सांगणारी तयारी
आदिवासी जीवनात अरण्यविद्या आणि अरण्यसंस्कृती सहज मिसळलेली आहे. माघ संपताच रानवाटा कोरड्या होतात. उन्हाची चाहूल लागते. पळसाची लाल फुले रंगासाठी साठवली जातात. साग व सलईची पानगळ सुरू होते. मोहाची मोत्यासारखी फुले टपटप झडू लागतात. तळ्यांवर वन्य प्राणी पाणी पिताना दिसतात.
फाल्गूनचा चंद्र दिवसेंदिवस भरू लागतो आणि होळीची चाहूल जंगलभर पसरते. ढोलांचे चामडे बदलले जाते. मोहाची दारू तयार करून ठेवली जाते. माघी अमावास्येला रोवलेल्या एरंडाच्या दांड्याभोवती लाकडांचा ढिग साचतो. पूर्वी होळी अनेक दिवस पेटती राहावी म्हणून ट्रकभर लाकूड गोळा केले जात असे; आता ते प्रमाण कमी झाले असले तरी उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही.
---
होळी जळतेय : ज्वाळांतून उमटणाऱ्या आठवणी
चार दशकांत अनुभवलेल्या चाळीस होळ्यांपैकी प्रत्येकाची शोभा निराळी; परंतु डाब, मोलगी, खार्यापडाव, करजाणे, देवझिरी या होळ्यांच्या उंच ज्वाळा मनात कायमच्या कोरल्या गेल्या.
एका फाल्गून पौर्णिमेला नंदुरबारचे प्राचार्य डॉ. बी. एस. पाटील यांच्या सहवासात अमलीबारी, मोलगी, काठी येथे होळी अनुभवण्याचा योग आला. पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर होता. पक्ष्यांच्या पिसांनी सजलेल्या टोप्या घातलेले समूह चांदण्यातून पुढे सरकत होते. जंगलातील प्रत्येक झाड, प्रत्येक सावली जिवंत भासत होती. ढोलांचे नाद वाढत गेले आणि काठीच्या होळीला तर राजेशाही थाट लाभला होता—शिस्त, प्रेम आणि सामूहिक आनंद यांचे अद्भुत मिश्रण.
वैजापूरजवळील खार्यापडावची होळी तर विशेष स्मरणीय. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातून ८०–९० ढोल येथे एकत्र येतात. चंद्राला भिडणारा उंच दांडा, फुलमाळांनी सजलेला. पठारावर स्त्री-पुरुषांची गर्दी उसळलेली. दक्षिणेला उंच सातपुडा, उत्तरेला अनेर नदीचा मंद स्वर. रात्री बारा वाजता संपूर्ण पठार ढोलाच्या तालावर थिरकते. दीड वाजता मुखियाच्या हस्ते पूजा होऊन होळी प्रज्वलित होते आणि क्षणभर सारे विश्व त्या ज्वाळांत सामावते.
करजाणे व देवझिरीची होळीही वेगळी ठरली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांच्या हस्ते ती प्रज्वलित झाली. डॉ. गणेश देवी यांची उपस्थिती लाभली. आदिवासी संस्कृती, त्यांच्यावर झालेली ऐतिहासिक अन्यायाची छाया आणि त्यांचे मनस्वी जगणे याविषयी झालेल्या संवादांनी ही होळी अधिक अर्थपूर्ण ठरली. पेटलेल्या ज्वाळांच्या प्रकाशात महाश्वेता देवी जणू निसर्गदेवतेप्रमाणे भासत होत्या.
---
होळी : समरसतेचा अखंड संदेश
सातपुड्यातील होळी हा केवळ एक दिवसाचा उत्सव नाही; ती शेकडो वर्षे माणसं जोडणारी ज्वाळांची साखळी आहे. या निबिड अरण्यात भौतिक सुखसुविधा कमी असल्या, तरी प्रेम, विश्वास, सुरक्षितता आणि परस्पर स्नेह यांची श्रीमंती अमाप आहे.
द्वेषाकडून प्रेमाकडे, संघर्षाकडून सलोख्याकडे, अलगतेकडून समरसतेकडे नेणारा संदेश ही होळी देते. दोन्ही बाजूंनी दाट जंगल आणि मधोमध धुळीचा रस्ता—हा आदिवासी जीवनमार्ग. या मार्गावर परंपरा, रूढी आणि मातीशी असलेली बांधिलकी जपली जाते.
होळीसमोर ढोलाच्या तालावर नाचताना त्यांच्यातील अहंकार वितळतो. पळसाची लाल फुले, सागाची पानगळ, काटेसावराचा गुलाबी बहर, चांदण्यांनी उजळलेले पठार—या साऱ्यांतून दया, क्षमा, प्रेम आणि त्याग यांचे दर्शन घडते.
आदिवासी मनोमन म्हणतात—
“मोहाच्या झाडाखाली कष्ट करून जगू; पण सगे-सोयऱ्यांशी द्रोह करणार नाही.”
याच त्यागी, प्रेमळ आणि पावन वृत्तीमुळे आपली पावले पुन्हा पुन्हा सातपुड्याकडे वळतात—होळीच्या त्या पवित्र ज्वाळांना वंदन करण्यासाठी.
---
लेखक :
प्रा. प्रकाश धर्माधिकारी
📞 ९८२२० ९१९२३