logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

इन्स्टाग्राम हनीट्रॅपद्वारे तरुणाचा खून : फलटण ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक कट


फलटण :
एका २२ वर्षीय तरुणाचा अत्यंत थंड डोक्याने कट रचून खून करणाऱ्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रेमाचे खोटे नाटक रचून, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जाळ्यात ओढत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार जणांना अटक केली असून, हा गुन्हा ‘ऑनर किलिंग’च्या छायेत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फलटण तालुक्यातील गोखळी गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. सुरुवातीला या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, पुढील तपासात मृतदेह हा अंकुश बापू नरबट (वय २२, रा. ढाकणी, ता. माण) याचा असल्याचे निष्पन्न झाले.
असा रचला ‘मौत का जाळ’
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मृत अंकुशने आरोपींच्या कुटुंबातील एका तरुणीबाबत गैरवर्तन केल्याचा आरोप असून, याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्याला संपवण्याचा कट रचला. यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला.
आरोपींनी एका महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि भेटीसाठी फलटणला बोलावले. दि. १५ फेब्रुवारी रोजी अंकुश फलटणला आल्यानंतर आरोपींपैकी एका महिलेने त्याला निर्जन अशा तातमगिरी डोंगराच्या पायथ्याला नेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या इतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला चारचाकी वाहनातून पिंप्रद गावच्या हद्दीत नेऊन हत्या करण्यात आली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नीरा नदीत फेकून देण्यात आला.
सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून उलगडा
हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांकडे ठोस पुरावे नसतानाही फलटण ते दहीवडी रस्त्यावरील हॉटेल्स, दुग्धव्यवसाय केंद्रे व पेट्रोल पंपांवरील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल लोकेशन व कॉल डिटेल्सच्या तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी गुन्ह्याची साखळी उलगडली आणि आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
अटक केलेले आरोपी (सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण)
आविष्कार ज्ञानेश्वर भगत
श्रद्धा आविष्कार भगत
ज्ञानेश्वर भरतराव भगत
अर्चना ज्ञानेश्वर भगत
या पथकाने केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई तुषार दोषी, वैशाली कडुकर व विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सोशल मीडियाचा गैरवापर करून घडवण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यांबाबत समाजाने सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

10
201 views

Comment