प्रश्नांतून शोधाकडे आणि शोधांतून ज्ञानाकडे; इकरा पब्लिक शाळेत विज्ञानाचा चैतन्यदायी उत्सव!
जळगांव २८/०२/२०२६:
भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी.व्ही.रमन यांनी लावलेल्या 'रमन इफेक्ट' या जागतिक संशोधनाच्या स्मरणार्थ, मोहाडी येथील इकरा पब्लिक स्कूलमध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक इश्तियाक अहमद यांनी केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना 'रमन इफेक्ट' म्हणजे काय आणि प्रकाश विखुरण्याच्या प्रक्रियेमागील विज्ञान अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक शेख शकील यांनी आपल्या भाषणात डॉ. सी.व्ही.रमन यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. "विज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी व्हावा आणि विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय लावून घ्यावी,"असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख उपशिक्षक आरीफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित विविध भित्तिपत्रके आणि प्रतिकृती तयार करून आपल्या कल्पकतेचे सादरीकरण केले.