logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ज्ञानयोगी ते जननेते : शिरूडच्या मातीतून उभा राहिलेला सेवाभावी ‘जिभाऊ’ प्रवास”



“ज्ञानयोगी ते जननेते : शिरूडच्या मातीतून उभा राहिलेला सेवाभावी ‘जिभाऊ’ प्रवास”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
"मातीचा मान, शेतकऱ्यांची शान आणि माणुसकीची ओळख असणारे अमळनेर तालुक्याचे लाडके नेतृत्व,"एक आदर्श शिक्षक,अभ्यासू प्राध्यापक आणि जनसामान्यांचे आधारवड..आदरणीय प्रा.सुभाष जिभाऊ यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन,भावी मंगलमय जीवन प्रवासासाठी मन:पूर्वक अनंत हार्दिक शुभकामना आणि त्यांच्या गौरवशाली समर्पित जीवनप्रवासाचे संक्षिप्त सिंहावलोकन..!!”

🌹शेतकरी मित्र, ज्ञानयोगी कर्मवीर : प्रा.सुभाष जिभाऊ यांचा अलौकिक जीवनप्रवास..!!🙏

“मातीचा गंध, कष्टांचा सुगंध आणि निस्वार्थ सेवेचा अनुबंध : जनमानसातील ‘जिभाऊ’ नावाचा एक महाप्रवास”

ज्या मातीने संतांचा वारसा जपला आणि ज्या मातीने क्रांतीचा हुंकार दिला, त्याच खान्देशातील शिरूडच्या श्री दत्तगुरूंच्या पावनभूमीत १ मार्च १९६३ रोजी एका अशा ध्येयवादी आणि समाजनिष्ठ नेतृत्वाचा उदय झाला,आपल्या कार्य, विचार आणि निस्वार्थ वृत्तीच्या बळावर ज्यांनी केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या क्षितिजावर आदराचे आणि विश्वासाचे अढळ स्थान निर्माण केले. शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या मनात ज्यांच्याबद्दल अपार आदर आहे आणि ज्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते, ते म्हणजे प्रा.सुभाष सुकलाल बाविस्कर — तथा ‘जिभाऊ’.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आवाका हा एखाद्या विशाल वटवृक्षासारखा आहे,ज्याच्या मुळाशी कष्टांचे खतपाणी आहे आणि ज्याच्या सावलीत हजारो निराधारांना मायेचा आधार मिळाला आहे. जिभाऊंच्या जीवनाकडे पाहताना गालिबांचा एक शेर आठवतो,

"हाथों की लकीरों पे मत जा ऐ गालिब,
नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते।"

जिभाऊंनी केवळ नशिबावर विसंबून न राहता, आपल्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे आणि समाजाचे भाग्य रेखाटले. शिरूडच्या ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर’ या जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेली ही वाटचाल 'न्यू इंग्लिश स्कूल, शिरूड' या माध्यमिक शाळेत पुढे बहरत गेली आणि अमळनेरच्या जगप्रसिद्ध प्रताप कॉलेजच्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेत तावून-सुलाखून अधिक परिपक्व झाली. Inorganic Chemistryची कठीण समीकरणे सोडवणाऱ्या या व्यक्तीने जीवनाच्या गुंतागुंतीची गणितेही तितक्याच सहजतेने उलगडली.

Chemistry is the study of change’ असे विज्ञान सांगते; पण जिभाऊंनी हा अर्थ केवळ अणू-रेणूंच्या प्रयोगशाळेपुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी जीवनाच्या विस्तीर्ण पटावर परिवर्तनाची हीच संकल्पना जिवंत केली. ‘Change is the rule of Nature’ या निसर्गनियमाला ध्येय मानत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची विलक्षण किमया त्यांनी साधली. म्हणूनच त्यांच्या कार्यात विज्ञानाची सूक्ष्म दृष्टी आणि समाजकारणाची व्यापक संवेदना यांचा सुंदर संगम दिसून येतो.

जिभाऊंच्या तारुण्याचा तो कालखंड म्हणजे संघर्षाच्या धगधगत्या अग्नीतून तावून-सुलाखून निघालेले एक कांचनच होते. शिरूडच्या मातीतून अमळनेरच्या ज्ञानमंदिरापर्यंतचा त्यांचा तो आशादायी प्रवास म्हणजे केवळ मैलांचे अंतर नव्हते, तर ती एक ध्येयवेडी तपश्चर्या होती. ज्या काळात एका वेळच्या डब्यातील अन्नाचे दोन भागात विभाजन करून, पोटाच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक मोठी मानणारा तो संयमी विद्यार्थी आज आपल्या कर्तृत्वाच्या बळावर हजारो दीन-दलितांच्या आणि शेतकऱ्यांच्या घरातील चुली पेटवणारा लोकनेता झाला आहे. त्या संघर्षातूनच आज हजारो सामान्यांच्या आयुष्यात तृप्तीचा घास देण्याचे बळ त्यांच्या मनगटात एकवटले आहे.

प्रताप कॉलेजच्या हॉस्टेलमधील त्या छोट्याशा खोलीत अमळनेर तालुक्यातील विविध गावांमधून आलेली तरुण मुले एकत्र राहत होती. तारुण्याच्या त्या उंबरठ्यावर जिभाऊंनी केवळ मित्र जोडले नाहीत, तर वेगवेगळ्या कुटुंबांतून आलेल्या या सवंगड्यांना जिव्हाळ्याच्या सूत्रात गुंफले. एकाच छताखाली राहताना एकमेकांना सावरून घेण्याच्या आणि सर्वांना आपलेसे करण्याच्या त्यांच्या या वृत्तीतून खऱ्या अर्थाने 'वसुधैव कुटुंबकम' हा विचार त्यांच्या आचरणात दिसू लागला. ती खोली म्हणजे त्यांच्यासाठी एक कौटुंबिक पाठशाळाच होती आणि जिभाऊ सर्वांना प्रेमाने एकत्र जोडणारे एक खंबीर दुवा होते.

महाविद्यालयीन जीवनाच्या त्या धावपळीतही त्यांच्या मनाचा एक कोपरा नेहमीच निरागसतेने भरलेला असे. तरुण वयातील महत्त्वाकांक्षांच्या जगात वावरत असताना त्यांना लहान मुलांमध्ये रमायला आणि खेळायला मनापासून आवडायचे. त्यांच्या मते, लहान मुले म्हणजे देवाघरची फुले; त्यांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण मनाला टवटवीत आणि चैतन्यमयी करणारा असे. मुले जेव्हा खेळता खेळता निरागसपणे आपल्याला काहीतरी नवीन शिकवायची, तेव्हा मिळणारा आनंद हा कोणत्याही पदवीपेक्षा मोठा असायचा. त्या बालसुलभ विश्वात रमल्यामुळेच कदाचित जिभाऊंच्या स्वभावात एक प्रकारचा जिवंतपणा आणि अजातशत्रुत्व कायम राहिले.

वडिलांच्या छत्रछायेचे अकाली हरवलेले सावट आणि आईने काळजावर दगड ठेवून दिलेला शिक्षणाचा धीर, सोबतीला आजोबा आदरणीय श्री पंडित राघो पाटील यांनी शेतीच्या बांधावरून दिलेला भक्कम आधार; या त्रिवेणी संगमातून जिभाऊ नावाचे एक कणखर व्यक्तिमत्व आकारास आले.
त्या काळात गावात राहणाऱ्या शिक्षक कुटुंबांतील मुले हिरिरीने शिक्षण घेत असत. आपल्या अवतीभोवतीची ही शिकणारी मुले पाहून जिभाऊंच्या मनातही शिक्षणाची एक प्रबळ उर्मी दाटून आली. 'आपणही शिकावे आणि मोठे व्हावे' या ओढीने त्यांनी शिक्षणाचा मार्ग धरला आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठले.

त्यांच्या प्रवासात माध्यमिक शिक्षणातील सातवीचे ते वर्ष केवळ एक शैक्षणिक टप्पा नव्हते, तर त्यांच्यातील उपजत नेतृत्वाच्या उदयाची ती एक मंगल पहाट होती. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच सातवीच्या या विद्यार्थ्याने 'जी.एस.' पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती. दहावी सारख्या मोठ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत मिळवलेला तो विजय म्हणजे भविष्यातील एका धडाडीच्या लोकनेत्याची खणखणीत नांदी होती. या विजयाचे मर्म ओळखून गावातील आदर्श व्यक्तिमत्त्वे आदरणीय श्री रतन बापू आणि आदरणीय श्री आप्पा पाटील यांनी जिभाऊंच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली. ती थाप म्हणजे त्यांच्यातील सेवाभावी वृत्तीला मिळालेला एक मोठा आशीर्वाद होता. तो क्षण त्यांच्या सामाजिक आणि राजकीय आयुष्याचा खऱ्या अर्थाने वळणबिंदू ठरला, जिथून निस्वार्थ जनसेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला.

त्यांच्या या प्रवासावर विन्स्टन चर्चिल यांचे एक वाक्य तंतोतंत लागू पडते, "Success is not final, failure is not fatal: it is the courage to continue that counts." "यश अंतिम नसते,अपयश घातक नसते; पुढे चालू ठेवण्याचे धैर्यच खरे महत्त्वाचे असते." पराभवाने न खचता आणि विजयाने न माजता,जनसेवेचे व्रत त्यांनी अखंडपणे जोपासले.

१९९२ मध्ये किसान महाविद्यालय, पारोळा येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर, त्यांच्या नावाआधी 'प्राध्यापक' ही सन्मानाची पदवी लागली खरी, परंतु त्यांच्या मनातील 'गावगाडा' आणि 'शेतकरी' कधीच दूर झाला नाही. खडू आणि फळा हातात धरला असला, तरी समाजाच्या वेदना पुसण्याचे व्रत त्यांनी अखंड जपले. एकेकाळी सायकलीवर आजारी माणसांना बसवून, शिरूड ते धुळ्यापर्यंतच्या दवाखान्यांची पायपीट करणारा हा ध्येयवेडा तरुण, पुढे मुंबईच्या ' K.E.M. हॉस्पिटलसारख्या मोठ्या वैद्यकीय केंद्रांपर्यंत सामान्यांची सोय करणारा 'देवदूत' ठरला. पद आणि प्रतिष्ठा बाजूला सारून, सामान्यांच्या सुखासाठी सरकारी दप्तरी आणि दवाखान्यांच्या पायऱ्या झिजवणारा हा प्रवास त्यांच्या निस्वार्थ माणुसकीची साक्ष देतो. त्याच कालखंडात वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढून देणे असे अडलेले नडलेले कामे अधून मधून ते करत राहायचे.

सत्तेपेक्षा सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या जिभाऊंनी, शिरूड गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळताना विकासाची एक नवी परिभाषा निर्माण केली. त्यांच्या दूरदृष्टीचे सर्वात जिवंत आणि क्रांतीकारी प्रतीक म्हणजे 'नल-जल योजना'. शिरूड गावातील पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य कायमचे संपवण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम नळजोडणीचा यशस्वी प्रयोग राबवला आणि गावाला कायमचे टँकरमुक्त केले. घराघरात पोहोचलेली पाण्याची धार ही केवळ सोय नव्हती, तर आया-भगिनींच्या कष्टाला दिलेला तो मायेचा आधार होता.

त्यांच्या या विकासपर्वात केवळ पाणीच नव्हे, तर गावाच्या वैभवात भर घालणारी इतरही अनेक कामे मार्गी लागली. शिरूडमधील बहुतांश गल्ल्या आणि चौक सिमेंट - काँक्रिटीकरणाने उजळून निघाले. विकासाच्या या गंगेसोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भानही जपले. 'गरिबांची सेवा हीच ईश्वरसेवा' मानून त्यांनी गरजू कुटुंबांना भांडी वाटप करून त्यांच्या संसाराला हातभार लावला.
जिभाऊंचा हा कालखंड शिरूडच्या इतिहासात केवळ कामांचा डोंगर उभा करणारा नव्हता, तर सामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणारा एक सुवर्णकाळ ठरला आहे.

"खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले,
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है।"

ग्रामपंचायतीचा अर्थकारभार शिस्तबद्ध आणि पारदर्शक ठेवत त्यांनी ‘बॅलन्स बजेट’चा पथदर्शी प्रयोग साकारला आणि स्थानिक प्रशासनात आर्थिक सुबत्ता कशी साधायची याचा आदर्श घालून दिला. त्याच कालखंडात राष्ट्रीयकृत बँकांचा आधार घेऊन स्वतः जामीनदार होऊन जोखीम पत्करली व तरुणांना तसेच बचत गटांना उभे राहण्यासाठी हातभार लावला.

'सहकार हाच उद्धाराचा मार्ग' हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे काम त्यांनी गेल्या तीन दशकांपासून अविरतपणे केले आहे. विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सलग ३० वर्षे संचालक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर संस्थेला एक नवी उंची प्राप्त करून दिली. केवळ संचालकच नव्हे, तर चेअरमनपदाची धुरा सांभाळताना त्यांच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभारामुळे ही सोसायटी सातत्याने नफ्यात राहिली, हे त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या मते, ही सोसायटी केवळ एक वित्तीय संस्था नसून ती बळीराजाचा खऱ्या अर्थाने कणा आहे. 'शेतकऱ्यांसाठी काम करणारी ही सोसायटी म्हणजे त्यांच्या जीवनातील एक आत्मरूपी आधार आहे', असा त्यांचा अढळ विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारी आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारी ही संस्था म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मंदिरच आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीने केवळ नफाच कमावला नाही, तर हजारो शेतकऱ्यांचा 'विश्वास' ही सर्वात मोठी पुंजी कमावली आहे.

अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे आणि न डगमगता संघर्ष करणे हा जणू त्यांच्या स्वभावाचा अंगभूत गुणधर्मच आहे . त्यामुळे ते बहुतांश वेळा सत्तेला धाडसाने विरोध करत राहिले; परंतु राजकारणात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशी खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली.

विरोधात असतानाही शेतकरी मालाच्या प्रमाणित वजन काट्यावरील हक्कासाठी, दुष्काळी परिस्थितीत पीक विम्याच्या पैशांसाठी तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना निधी मिळावा यासाठी त्यांनी दिलेला लढा हा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

जिभाऊंच्या जीवनावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव आहे. गांधीवादी मूल्यांनी त्यांच्या विचारविश्वाची जडणघडण केली. "खेड्याकडे चला" या मंत्राला त्यांनी केवळ शब्दांत नाही, तर कृतीत उतरवले. गरज पडल्यास शेतकऱ्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीतच 'क्लीन' व्हावा आणि त्याला तिथेच योग्य भाव मिळावा, ही त्यांची तळमळ आजही कायम आहे.

प्रशासकीय अधिकारी जर कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील असतील, तर सामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळतो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. मा.तहसीलदार प्रदीप पाटील सर आणि मा.प्रांत राम कुलकर्णी सर यांच्यासारख्या लोकभिमुख अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच अन्यायाविरुद्धच्या संघर्षाला बळ मिळाले आणि न्यायाची चाके खऱ्या अर्थाने गतिमान झाली. परंतु, केवळ पाठपुरावा करून चालत नाही; लोकशाहीत 'संख्याबळाला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादे सार्वजनिक काम मार्गी लावायचे असेल किंवा आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधायचे असेल, तर आपल्यासोबत असलेल्या जनसमुदायाचा एक वेगळाच दरारा निर्माण होतो. जेव्हा मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, तेव्हा प्रशासनावरही नैतिक दबाव निर्माण होतो आणि प्रलंबित कामे जलद गतीने पूर्ण होतात. म्हणूनच, वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा सामूहिक शक्तीच्या जोरावर लढलेला लढा अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरतो, असे त्यांना प्रकर्षाने वाटते.

स्वतःच्या प्रदीर्घ अनुभवांच्या शिदोरीतून त्यांना ठामपणे जाणवले की कठोर परिश्रम आणि सखोल अभ्यासाच्या बळावर घडलेले IAS अधिकारी जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून कार्यरत असतात. त्यांच्या समोर जर आपल्या बाजूचे सत्य समर्थपणे मांडले, तर गरिबांना न्याय मिळतोच, हा त्यांचा अढळ आणि दृढ विश्वास आहे .

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार आदरणीय आबासाहेब Dr. B. S. Patil यांच्यासारख्या प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श त्यांच्या वाटचालीला लाभलाच; शिवाय आदरणीय Gopinathraoji Munde साहेबांशी झालेल्या एका प्रसंगीच्या भेटीत त्यांच्या सामाजिक कार्याची मांडणी झाल्यापासून मुंडे साहेबांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्वही त्यांना आदर्शवत वाटू लागले.या दुहेरी प्रेरणेच्या बळावर त्यांनी समाजकार्याची नवी उंची गाठली.”

सेवानिवृत्तीनंतरही विश्रांती घेण्याऐवजी, कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीशी झुंज देत असतानाही, दिवसाला १०० फोन अटेंड करून लोकांची कामे मार्गी लावणारा हा योद्धा खऱ्या अर्थाने 'मृत्युंजय' आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे अल्पायुष्य पण महान कार्य डोळ्यासमोर ठेवून,"मृत्यूची भीती कशाला?" असा रोकठोक सवाल ते विचारतात.

आजही त्यांच्या यशस्वी प्रवासामागे सावलीसारखी उभी असलेली त्यांची धर्मपत्नी, पी.एच.डी पूर्ण केलेली सुविद्य कन्या आणि ॲमेझॉनमध्ये उच्चपदस्थ असूनही मातीशी नाळ जोडून असलेला पुत्र, हे त्यांचे खरे वैभव आहे.

तरुणांना व्यसनमुक्तीचा आणि वेळेच्या मोलाची जाणीव करून देताना ते नेहमी सांगतात,‘शेती ही अमर प्रॉपर्टी आहे, तिला कधीही सोडू नका.’ स्त्रियांनी शिक्षण घेऊन नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे यावे, तसेच जातिभेद न मानता विविध समाजातील समविचारी कुटुंबांमध्ये वैवाहिक संबंध आनंदाने आणि समजुतीने जुळावेत, हा त्यांचा व्यापक आणि प्रगत विचार आहे . या सर्व मूल्यांचा आग्रह धरताना ते खऱ्या अर्थाने आधुनिक समाजाचे शिल्पकार वाटतात .

जिभाऊंनी आयुष्यभर ना जात पाहिली, ना धर्म पहिला; त्यांनी पाहिला तो फक्त 'माणूस' आणि त्याची 'गरज'. त्यांच्या या निःस्वार्थ प्रवासाला शब्दांत पकडणे कठीण आहे. शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते,

"Work for a cause, not for applause.
Live life to express, not to impress."

“प्रशंसेच्या क्षणभंगुर गजरासाठी नव्हे, तर अर्थपूर्ण ध्येयासाठी कार्य करा; दिखाव्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी आयुष्य जगा.”

आदरणीय जिभाऊंच्या आयुष्याचा पुढील प्रवास आई कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंगल आशीर्वादाने अधिक सुखसमृद्धीचा, उत्तम आरोग्याचा आणि चैतन्यमयी ऊर्जेचा जावो, हीच श्री आईंसाहेबांच्या चरणी विनम्र प्रार्थना! मातीशी इमान राखणाऱ्या या निष्ठावान 'शेतकरी पुत्राचा' आणि ज्ञानसाधना करणाऱ्या 'ज्ञानयोग्याचा' हा ध्येयवादी जीवनप्रवास, येणाऱ्या पिढ्यांसाठी कर्तव्यदक्षतेचा आणि निस्वार्थ सेवेचा एक देदीप्यमान 'दीपस्तंभ' म्हणून सदैव मार्गदर्शक ठरेल.

शब्दांकन :
श्री प्रविण बोरसे सर,
शिरूड,ता.अमळनेर,जि.जळगाव

6
171 views

Comment