logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आगरदांडा जेट्टी ते आगरदांडा ग्रामपंचायत रस्ता काँक्रीटीकरणास प्रारंभ; ६ कोटींच्या विकासकामाला वेग


अगरदांडा / साकिब गजगे
आगरदांडा जेट्टी ते आगरदांडा ग्रामपंचायत दरम्यानचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि चिखल यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका सेवा तसेच मच्छीमार बांधवांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर तब्बल ६ कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. मजबूत व टिकाऊ काँक्रीट रस्ता तयार होणार असल्याने भविष्यात वारंवार दुरुस्तीची गरज भासणार नाही. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि जलद होणार आहे. व्यापार, मासेमारी व्यवसाय तसेच पर्यटनालाही याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या महत्त्वाकांक्षी कामाला स्थानिक आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी विशेष प्रयत्नांद्वारे मंजुरी मिळवून दिली. सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विकासकामांबाबत त्यांची तळमळ आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी आमदार महेंद्र दळवी साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, “विकासाच्या दिशेने उचललेले हे मोठे पाऊल आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

रस्ता पूर्ण झाल्यानंतर आगरदांडा परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे. हे काम केवळ रस्त्याचे नसून, परिसराच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक ठरत आहे

31
1846 views

Comment