जनता विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त साहित्य-संस्कृतीचा जागर
जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ८.०० वाजता कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे तसेच विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक कु. शारदा बऱ्हाटे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, यामागील ऐतिहासिक व साहित्यिक पार्श्वभूमी विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु. प्रगती शिंदे यांनी मराठी साहित्यातील विविध नामवंत साहित्यिकांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांमध्ये भाषाभिमान जागवण्याचे आवाहन केले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्यवैभवाची ओळख करून दिली. तसेच ‘नटसम्राट’ या गाजलेल्या नाटकाविषयी माहिती देताना ते म्हणाले, “कुसुमाग्रजांच्या कवितांमधील जाज्वल्य अभिमान आपल्या आचरणात आणणे हाच खरा भाषा गौरव आहे.”
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या नृत्याचे मार्गदर्शन सौ. वैशाली मांजाटे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर आधारित भाषणे, निबंध वाचन आणि घोषवाक्य सादरीकरण करून कार्यक्रमात रंग भरला. साहित्यिकांविषयी माहिती देणारी आकर्षक पोस्टर्सही तयार करण्यात आली.
विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, “मराठी केवळ आपली भाषा नसून ती आपली संस्कृती आणि अढळ ओळख आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी देशमाने व प्रियंका सोनोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. संजना गायकवाड हिने केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मराठी विषय समिती प्रमुख सौ. वैशाली मांजाटे, कार्यक्रम प्रमुख पर्यवेक्षक संजय पिवटे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रेरणादायी आणि भाषाभिमान जागवणाऱ्या वातावरणात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.