logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

🌿 दुर्मिळ होत चाललेल्या भोकर वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती — देशी औषधी वारसा जपण्याचे आवाहन 🌿

निसर्गाने मानवाला दिलेल्या अमूल्य देणग्यांपैकी एक असलेले भोकराचे झाड आज हळूहळू दुर्मिळ होत चालले असून या औषधी व उपयुक्त वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुर्वेदाचार्य डॉ. विलास जगन्नाथ शिंदे यांनी केले आहे. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान, ग्रामीण संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम असलेल्या भोकर वृक्षाविषयी त्यांनी मांडलेले अनुभव आणि माहिती सध्या जनजागृतीचे माध्यम ठरत आहेत.

डॉ. शिंदे यांनी आपल्या बालपणातील आठवणी सांगताना अष्टविनायक क्षेत्रातील पाली परिसरातील ‘मजरे जांभूळ पाडा’ गावात प्राथमिक शाळेच्या आवारातील भोकराच्या झाडाशी जुळलेले भावनिक नाते व्यक्त केले.



आयुर्वेदात “श्लेष्मांतक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाचे औषधी महत्त्व मोठे असूनही आधुनिक काळात त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



विदेशी शोभेच्या झाडांऐवजी स्थानिक, उपयुक्त आणि औषधी गुणांनी समृद्ध देशी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आपल्या आयुर्वेदिक वैद्यकीय अनुभवातून भोकराच्या विविध औषधी उपयोगांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, कफ, सर्दी-खोकला, श्वसनाचे विकार, जुलाब, पचन समस्या तसेच शरीरशक्ती वाढविण्यासाठी भोकर अत्यंत उपयुक्त ठरते. भोकराच्या फळांपासून पाक, लोणचे, सरबत आणि पौष्टिक लाडू तयार करता येतात, जे आरोग्यास हितकारक मानले जातात.



दरम्यान, माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी भोकर संवर्धनासाठी उल्लेखनीय उपक्रम राबविला आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबासह गोंधन/भोकराच्या तब्बल पाच हजार बिया संकलित करून संवर्धनाचा संकल्प केला. या उपक्रमाची सुरुवात धार्मिक भावनेतून भगवान पांडुरंगाच्या चरणी बिया अर्पण करून करण्यात आली.



यापैकी एक हजार बिया राज्यातील दहा जिल्ह्यांतील वृक्षप्रेमींना प्रत्येकी शंभर या प्रमाणात मोफत वितरित करण्यात आल्या, तर उर्वरित चार हजार बियांपासून रोपे तयार करून जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी वाटप करण्यात आले. स्थानिक औषधी वृक्षांची संख्या वाढवणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.



भोकर हे केवळ एक झाड नसून आरोग्यदायी वरदान असल्याचे सांगताना खरमाळे यांनी स्वतःच्या अनुभवातून त्याचे पित्तशामक गुण अधोरेखित केले. उपयुक्त देशी वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी प्रत्येक गावात किमान एक भोकराचे झाड लावण्याचे आवाहन केले.

निसर्ग संवर्धन हीच ईश्वरसेवा मानून समाजाने स्थानिक जैवविविधता जपावी, माहिती जतन करावी आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणपूरक वारसा निर्माण करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

“निसर्ग जपा… आरोग्य जपा… परंपरा जपा.” हा संदेश देत नागरिकांनी भोकर वृक्ष लागवड व संवर्धन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



✍️ श्री . रमेश खरमाळे

माजी सैनिक



18
1177 views

Comment