logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांची ‘मयना’ कविता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

बुलढाणा, २५ फेब्रुवारी ( प्रतिनिधी) :
स्थानिक विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याला आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे. त्यांच्या ‘मयना’ या गाजलेल्या कवितेचा समावेश संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या बी.ए. भाग-२ च्या मराठी अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ‘वाहाडी कविता’ या पुस्तकात ही कविता समाविष्ट असून, या ग्रंथाचे संपादन आदिवासी साहित्य अभ्यासक प्राचार्य डॉ. काशिनाथ बाहाटे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अशोक इंगळे आणि डॉ. श्रीकृष्ण पद्मने यांनी केले आहे.
‘मयना’ ही कविता सर्कती या मराठी चित्रपटात समाविष्ट झाली असून, आघाडीचे गायक आदर्श शिंदे यांनी ती स्वरबद्ध केली आहे. तसेच झी टीव्ही तर्फे या कवितेचा स्वतंत्र अल्बमही प्रदर्शित करण्यात आला आहे.
डॉ. गायकी यांनी ‘आसूड’, ‘तांड’, ‘बिरसा मुंडा’, ‘सर्कती’ आदी मराठी व हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. ‘आसूड’ चित्रपटातील गीताला प्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांनी संगीत दिले असून, त्या गीताला २०१९ सालचा दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड प्राप्त झाला आहे.
साहित्य क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. ‘विनायक तुमराम यांचे साहित्य व लोकगीताचे अंतरवेध’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला असून, त्यास संशोधन क्षेत्रातील ‘रा. चिं. ढेरे संशोधन पुरस्कार’ तसेच ‘भुजंग मेश्राम साहित्य पुरस्कार’ प्राप्त झाले आहेत. साहित्य अकादमी तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव (नवी दिल्ली व पटना) येथे त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे फेस्टिव्हल आणि विविध विद्यापीठांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे.
सातपुडा परिसरातील आदिवासी बोलीभाषांवर त्यांचे संशोधनात्मक कार्य सुरू असून, ‘किक्यारिया’ हा त्यांचा नवीन कविता संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. ‘मयना’ कवितेच्या अभ्यासक्रमातील निवडीमुळे डॉ. गायकी यांचे सर्वत्र कौतुक होत असून, बुलढाणा जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

3
794 views

Comment