भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची 'भारत-इराण संसदीय मैत्री गटा'त निवड; आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा
भिवंडी:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘भारत-इराण संसदीय मैत्री गटा’त (India-Iran Parliamentary Friendship Group) सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभेच्या १८ व्या कार्यकाळासाठी ही निवड जाहीर झाली असून, लोकसभेचे सभापती यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्वाची निवड आणि पत्राचा तपशील
लोकसभा सचिवालयाकडून (परिषद आणि शिष्टाचार शाखा) २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्राद्वारे सुरेश म्हात्रे यांची या मैत्री गटात निवड झाल्याची माहिती देण्यात आली. भारत आणि इराण या दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे आणि दोन्ही देशांच्या संसदेमध्ये संवाद साधणे, ही या गटाची प्रमुख जबाबदारी असते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भिवंडीची ओळख
भिवंडीचे भूमिपुत्र म्हणून ओळखले जाणारे सुरेश म्हात्रे यांच्या या निवडीमुळे भिवंडी आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसदेत स्थानिक प्रश्न मांडण्यासोबतच आता त्यांना आंतरराष्ट्रीय धोरण आणि संबंधांमध्ये योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भिवंडीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केला आहे. 'बाळ्या मामा' यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी अत्यंत निष्ठेने पार पाडेन आणि भारत-इराण संबंधांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देईन," अशी भावना खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.