logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद शाळा लोणी मध्ये रंगला बाल आनंद मेळावा; विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘व्यवहारज्ञानाचा’ उत्सव

लोणी प्रतिनिधी – तेजस वाळुंज

ता. आंबेगाव येथील लोणी गावातील जिल्हा परिषद शाळा लोणी परिसरात आयोजित करण्यात आलेला ‘बाल आनंद मेळावा’ उत्साह, चैतन्य आणि नवउमेद यांचा सुंदर संगम ठरला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शाळेच्या आवारात दिवसभर लहानग्यांची लगबग, स्टॉल्सवरील गर्दी आणि आनंदी वातावरण पाहायला मिळाले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून विविध प्रकारचे स्टॉल्स उभारले होते. ‘खाऊ गल्ली’, ‘बाजार स्टॉल’ तसेच घरगुती खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. भाजीपाला, फळभाज्या, दक्षिणात्य खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थ, विविध प्रकारची चॉकलेट्स तसेच संतुलित आहारातील पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत विक्री, पैशांची देवाणघेवाण, हिशेब नोंदणी अशी कामे आत्मविश्वासाने पार पाडली. यावेळी शिक्षिका मोटे मॅडम यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे.” त्यांच्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमास लोणी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. साळगाव नाईक, माजी उपसरपंच शिवाजीराव गायकवाड, समाजभूषण कैलासराव गायकवाड, ग्रामपंचायतचे माजी सदस्य रवींद्र रोकडे, राहुल भागवत, विशाल वाळुंज, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अधिकारी वैभव लंके, दिगंबर तात्या सोनवणे, शिक्षण समितीचे अध्यक्ष गौरव रोकडे, उपाध्यक्ष सोनाली खंडागळे तसेच बळशीराम वाळुंज, निर्मला कदम, मंगेश थोरात, कांचन गायकवाड, योगेश वाळुंज, अस्मिता जाधव, सोमनाथ वाळुंज, वर्षातून आढाव, यशवंत वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री भैरवनाथ विद्याधाम शाळेचे प्राचार्य ढगे सर, तांबोळी सर आणि इतर ग्रामस्थांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. शाळेचे मुख्याध्यापक मोबीन मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कदम सर, चौधरी सर, मोटे मॅडम व इतर शिक्षक सहकाऱ्यांनी या मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. बाल आनंद मेळावा हा केवळ खरेदी-विक्रीचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना बळकट होत असून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारीही घडत आहे.

24
1262 views

Comment