रिदा अबरार खान हिने राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत मिळवले प्रथम पारितोषिक
प्रतिनिधी जुबेर शाह
बुलढाणा : येथील सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूल या नामांकित शाळेची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. रिदा अबरार खान (वय १४ वर्षे) हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम पारितोषिक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा २० फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजी सायन्स कॉलेज येथे पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, तर २०० पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आली होती.
कु. रिदा अबरार खान हिने “AI स्मार्ट मिरर असिस्टंट” या आधुनिक व तंत्रज्ञानाधिष्ठित प्रकल्पाच्या माध्यमातून हे यश संपादन केले. हे मॉडेल अत्यंत नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि व्यवहार्य असल्याचे मत परीक्षकांनी नोंदवले असून, परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकांकडूनही या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळा, पालकवर्ग तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढला असून, कु. रिदा खान हिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.