logo

शिवजयंतीनिमित्त कल्याण शहरात सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांची रेलचेल .....

ठाणे / कल्याण
स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

यंदा या उत्सवाचे दहावे वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण आठवडाभर विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवानिमित्त खजिना शोध स्पर्धा, बांदल सेनेचे सादरीकरण तसेच बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची शौर्यगाथा उलगडणारा “पावनखिंड” हा देखावा साकारण्यात आला.

याशिवाय भजन - कीर्तनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले.

१८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर फटाक्यांच्या रोषणाईत शिव-गारद देऊन शिवजन्मोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

सकाळी किल्ले दुर्गाडी येथे मशाल प्रज्वलन करून निळकंठ पार्क गृहसंकुलापर्यंत भव्य मशाल दौड आयोजित करण्यात आली.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहरप्रमुख श्री. सुनिल वायले यांची विशेष उपस्थिती लाभली.
तद्नंतर समस्त महिला वर्गाने बाळ - शिवाजी महाराजांचे प्रतीकात्मक स्वरूप साकारत पाळणा गीत गाऊन जन्मोत्सव साजरा केला. कार्यक्रमादरम्यान डॉ. तनुजा वायले, प्रमिला पाटील तसेच किरण भांगले या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सहभाग लाभला.
सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गृहसंकुलातील मुला-मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा सादर केला. काही महिलांनी देवींचे स्वरूप साकारले, तर महिला, युवती आणि लहान मुलींनी लेझिम खेळ सादर करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश दिला.

यावेळी लहान मुले तसेच युवक - युवतींनी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. लाठी - काठी, दांडपट्टा, ढाल - तलवार, बाणाकाटा तसेच केरळ राज्यातील पारंपरिक उरुमी ( लवचिक, चाबकासारखी पाती असलेली भारतीय तलवार ) यांसारख्या साहसी शस्त्रकलेचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.

सामर्थ्य ढोल - ताशा पथक, डोंबिवली यांच्या दमदार वादनाने कार्यक्रमाची शोभा वाढली.

स्वराज्य मित्र मंडळाच्या युवक - युवतींनी आधुनिक युगात लुप्त होत चाललेल्या भारतीय संस्कृती, इतिहास आणि पारंपरिक साहसी खेळांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमास क.डो.म.पा.च्या नवनिर्वाचित महापौर सौ. हर्षाली विजय चौधरी (थविल), माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक व नगरसेविका शालिनी वायले, कावेरी देसाई, कल्पेश देसाई, शामल गायकर, रवी पाटील (शिवसेना – कल्याण शहर प्रमुख) तसेच समाजसेवक उल्हास भोईर आणि रवी गायकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर उपस्थिती लाभली.

https://youtu.be/siWB47eRWQI?si=tMt_t0t55eUVgRZ-

7
2879 views