logo

महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात ; १६.१५ लाख विद्यार्थी सज्ज; ५,१११ केंद्रांवर परीक्षा, १९१ केंद्रे संवेदनशील

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची लेखी परीक्षा शुक्रवारपासून राज्यभरात सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यात ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार असून, राज्यभरातील २३,६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परीक्षा ५,१११ मुख्य केंद्रांवर पार पडणार असून, ती १८ मार्च रोजी संपन्न होणार आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या बारावी परीक्षेतील कॉपीप्रकरणांच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीच्या परीक्षेसाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. दहावी बोर्डाच्या एकूण केंद्रांपैकी १९१ केंद्रे संवेदनशील असल्याचे स्पष्ट करत, या केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडशे यांनी दिली.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा दक्षता समितीमार्फत बैठे पथकांची संख्या वाढवण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, ५५४ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध होऊ शकली नाही, असेही डॉ. बेडशे यांनी स्पष्ट केले.
एकूणच, विद्यार्थ्यांना निर्भय आणि सुरळीत वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत असून, परीक्षा प्रक्रियेवर कडक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

13
1496 views