शिवाजी महाराजांच्या जीवनातील धैर्य, न्यायप्रियता, आणि लोकसंग्रह हे गुण महत्वाचे : प्रमोद ठोंबरे
जनता विद्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी
पिंपळगाव सराई, दि. १९ फेब्रुवारी २०२६
पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे व कलाशिक्षक रवींद्र खानंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तर पत्रकार विठ्ठल सोनुने यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने व शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु. सरला पवार व स्नेहल गवते या माँ जिजाऊंच्या वेशभूषेत मंचावर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप लाभले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवकालीन पोवाडे, देशभक्तीपर गीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटोळे यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते रयतेचे राजे होते. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि आजही त्यांचा आदर्श आपल्याला स्वाभिमान, न्याय आणि नेतृत्व शिकवतो. विद्यार्थ्यांनो, शिवरायांचा आदर्श अंगी बाळगा आणि देशासाठी समर्पण करा!”
वक्त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. पर्यवेक्षक संजय पिवटे म्हणाले, “शिवरायांचे जीवन आपल्याला शिकवते की शत्रू कितीही बलवान असला तरी बुद्धी, धैर्य आणि एकजुटीने विजय मिळवता येतो. या शिवजयंतीनिमित्त आपण सर्वजण ‘स्वराज्य’ ही संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनात आणूया!”
कलाशिक्षक रवींद्र खानंदे यांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी पैलू अधोरेखित करत “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी...” या ओळींनी भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, “आजच्या या कार्यक्रमातून आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊया. आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासारखे धैर्यवान आणि सदाचारी नागरिक व्हावेत ही अपेक्षा आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी सांगितले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी माँ जिजाऊंच्या संस्कारांमुळे लहान वयातच स्वराज्याचा संकल्प केला. त्यांनी आपल्या जीवनात धैर्य, न्यायप्रियता, आणि लोकसंग्रह या महत्व पूर्ण गुणांची मांडणी कशा प्रकारे केली हे उदा देऊन स्पष्ट केले.आज आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन अभ्यास, शिस्त आणि देशभक्तीने पुढे जावे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम उत्साह, प्रेरणा आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.