logo

एअर रायफल ज्युनियर वर्ल्डकपसाठी आळंदीच्या प्रीतम केंद्रेची निवड; शहरात आनंदाचे वातावरण

एअर रायफल ज्युनियर वर्ल्डकपसाठी आळंदीच्या प्रीतम केंद्रेची निवड; शहरात आनंदाचे वातावरण
आळंदी : 10 मीटर एअर रायफल ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धेसाठी आळंदीतील युवा नेमबाज प्रीतम केंद्रे यांची निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या सिलेक्शन ट्रायल्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी हे यश संपादन केले.
विविध राज्यांमधून सहभागी झालेल्या 600 पेक्षा अधिक स्पर्धकांमध्ये प्रीतमने 632.2 गुण मिळवत ज्युनियर गटात तिसरे स्थान मिळवले. सध्या ते महाळुंगे (पुणे) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून गन फॉर ग्लोरी शूटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षक किरण खंडरे व शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. पुढील महिन्यात केरो (इजिप्त) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल आळंदी नगरपरिषदेत नगरसेवक दिनेश घुले यांच्या पुढाकाराने प्रीतम केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले, ज्ञानेश्वर वाघमारे आणि दीपक काळे उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, “प्रीतमने कठोर परिश्रम व सातत्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. हे आळंदीकरांसाठी अभिमानास्पद असून शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. क्रीडा क्षेत्राला आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे.”
प्रीतम केंद्रे यांच्या या कामगिरीमुळे आळंदी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1
569 views
  
1 shares