logo

जामखेड येथे नर्तिकेवर कोयत्याने हल्ला; फरार आरोपीला पोलिसांची भूममधून अटक....

जामखेड (दि. १८ फेब्रुवारी २०२६): एका नर्तिकेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला जामखेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने भूम (जि. धाराशिव) येथून अटक केली आहे.
दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडित नर्तिकेने जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड; सध्या रा. मिलिंदनगर, जामखेड) याने फिर्यादीला फोन का उचलत नाहीस व नंबर ब्लॉक का केला, या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या दोन्ही हातांवर तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी गुन्हा रजि. नं. ६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५२, ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता.
दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी भूम बसस्थानक परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिस पथकाने तातडीने तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. रात्री सुमारे ९ वाजता आरोपी संशयास्पदरीत्या एका झाडाखाली लपून उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि जाधव मॅडम, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, नितीन शिंदे व राहुल गुंडू यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

33
1676 views