खडकवासला: कामावर असलेल्या मुलाला जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या वडीलांवर काळाने घाला घातला असून पोल्ट्री व्यावसायिकाच्या पिक अपने समोरुन दिलेल्या धडकेत
खडकवासला: कामावर असलेल्या मुलाला जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या वडीलांवर काळाने घाला घातला असून पोल्ट्री व्यावसायिकाच्या पिक अपने समोरुन दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वडीलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुंजाराम सुंदरराव मरकड (वय 65,रा. एस एन. पिंपळे यांचे फार्म हाऊस स्प्लेंडर कंट्री, मांडवी बुद्रुक ता.हवेली)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुंजाराम मारकड हे आपल्या मुलासाठी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जेवणाचा डबा घेऊन जात होते. मांडवी बुद्रुक येथील अरुंद पुलाजवळ अचानक भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ते उडून खड्ड्यात फेकले गेले व दुचाकीचा चुराडा झाला. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअपही उलटून पडली. यात मारकड यांचा जागीच मृत्यू झाला. नितेश गणेश पवार ( रा. भिमनगर, कोंढवे धावडे, उत्तम नगर, ता. हवेली) असे पिकप चालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर व हवेली पोलीस स्टेशन अशा दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदर ठिकाण पुणे ग्रामीण हवेली पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय कोळी यांच्याकडून कारवाई सुरू आहे.