logo

८३ ग्रा.पं.साठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम

जळगाव : वर्षभरापासून रखडत आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम दि. १७ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे. तीन महिन्यांच्या या कार्यक्रमानंतर ८३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण आणि निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत.

फेब्रुवारी २०२० व २०२१ मध्ये गत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला. ग्रामविकास विभागाने मंगळवारी ग्रा. पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २० फेब्रुवारी ते ४ मेदरम्यान प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे.

जि. प.च्या इच्छुकांना टेन्शन
जिल्हा परिषदेआधीच ग्रामपंचायत निवडणुकीची चूल पेटली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना गट आणि गणातील ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रिय व्हावे लागणार आहे. ग्रामपंचायतीसाठी इच्छुक असणाऱ्या धुरंधरांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना 'गावकी'च्या सत्ताकारणाचे 'टेन्शन' आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मे महिन्यानंतर आरक्षण

४ मे रोजी अंतिम प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रभागनिहाय व सरपंचपदासाठी आरक्षणाची प्रक्रिया पार पडेल. ऑगस्टनंतर आरक्षणाचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेल. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर या निवडणुका पार पडण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.

2
389 views