logo

वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –चार आरोपींना तात्काळ #अटक; न्यायालयाकडून पी.सी.आर.मंजूर.

#वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –चार आरोपींना तात्काळ #अटक; न्यायालयाकडून पी.सी.आर.मंजूर.

दिनांक १६/०२/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे ०५.३० वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील वस्तीगृह परिसरात घडलेल्या गंभीर घटनेप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १०९ (१), ५४.३ (५) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून नमूद गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या जबाबानुसार, दिनांक १६/०२/२०२६ रोजी दुपारी सुमारे ३.०० वाजण्याच्या सुमारास दुचाकी (ज्युपिटर) नुकसानप्रकरणी वाद निर्माण झाला होता. संबंधित वाहनाची नुकसानभरपाई मागण्याच्या कारणावरून केदार क्षिरसागर, श्रीधर जाधव (दोघे रा. शिवली, ता. औसा), प्रणव उदगीरे (रा. नळेगाव, ता. चाकूर) व सुजल दिंडे (रा. दिंडेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड) यांनी वाद घालत मारहाण केली असल्याचे नमूद आहे. दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सायंकाळी वस्तीगृहाच्या गेटसमोरील रस्त्यावर संबंधित आरोपींनी पुन्हा एकत्र येत हातातील लाकडी काठ्यांनी फिर्यादी व साक्षीदारांवर जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात मयत नामे विक्रम नारायण पांचाळ, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर यांना छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा, पुरावे संकलन, साक्षीदारांचे जबाब नोंदविणे व आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे व त्यांच्या तपास पथकाने जलद गतीने तपासाची सूत्रे हाती घेतली.तपासादरम्यान आरोपी नामे

केदार महादेव क्षिरसागर (वय १९ वर्षे),

श्रीधर तानाजी जाधव (वय २४ वर्षे),

प्रणव अप्पाराव उदगीरे (वय २० वर्षे),

सुजल जेजेराव दिंडे (वय १९ वर्षे)
यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.
नमूद आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक २१/०२/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी (पी.सी.आर.) मंजूर करण्यात आली आहे. सध्या आरोपी हे शिवाजी नगर पोलीस ठाणे, लातूर येथे पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
सदर प्रकरणात वापरण्यात आलेले शस्त्र, घटनेची नेमकी पार्श्वभूमी, सामूहिक हेतू व इतर बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे. घटनेत सहभागी इतर व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही किरकोळ कारणावरून कायदा हातात न घेता वाद-विवाद कायदेशीर मार्गाने सोडवावेत. युवकांनी भावनिक आवेशात हिंसक कृत्य न करता संयम बाळगावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलीस कटिबद्ध असून अशा गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

0
0 views