जनता विद्यालयात निरीक्षण समितीची भेट व अर्धवार्षिक आढावा बैठक संपन्न
जनता विद्यालयात निरीक्षण समितीची भेट व अर्धवार्षिक आढावा बैठक संपन्न
पिंपळगाव सराई, दि. १४ फेब्रुवारी २०२६ :
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव सराई येथे शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीच्या निरीक्षण समितीची भेट तसेच अर्धवार्षिक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात झालेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीपूर्वी निरीक्षण समितीने प्रत्येक शिक्षकाचा वैयक्तिक अहवाल तपासून त्यांच्या अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद, उपक्रमातील सहभाग आणि शैक्षणिक प्रगती यांचा सखोल आढावा घेतला. त्यानंतर औपचारिक आढावा बैठकीस प्रारंभ झाला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष सुभाष फटींग होते. यावेळी एस. एम. भालेराव, जगन्नाथ वानखेडे, रवींद्र बोंद्रे, सुरेश गारडे आदी निरीक्षण समिती सदस्य उपस्थित होते. सर्व सदस्यांनी विद्यालयातील शैक्षणिक कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकांनी घेतलेले परिश्रम, विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणलेले सकारात्मक बदल यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यासोबतच, शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी काही सूचनाही समितीने केल्या. “विद्यार्थी हे आपले दैवत आहेत, त्यांच्याशी संवेदनशीलतेने व समर्पणभावाने वागणे हीच खरी शिक्षकांची जबाबदारी आहे,” अशी अपेक्षा समिती सदस्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी केले. त्यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, निकालाची स्थिती व आगामी नियोजन याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक अविनाश असोलकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी व्यक्त केले.
शेवटी शांती मंत्राने बैठकीचा समारोप करण्यात आला. या बैठकीमुळे विद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.