logo

सानप, सहाय्यक फौजदार भीमराव बेल्लाळे, पोलीस अंमलदार विष्णू वायगावकर, बळवंत भोसले, राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

सार्वजनिक सुव्यवस्थेस गंभीर धोका ठरलेल्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए अधिनियम, 1981 अन्वये कठोर प्रतिबंधात्मक कारवाई.— एक वर्षाकरिता स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित

लातूर शहर व परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस दलामार्फत महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे, बेकायदेशीर जुगार व लॉटरी चालवणारे तसेच मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, 1981 (सन 1981 चा क्र.55) (सुधारणा 1996, 2009, 2015 व 2025) अंतर्गत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तसेच लातूर शहर परिसरात वारंवार बेकायदेशीर, समाजविघातक व दहशत निर्माण करणाऱ्या कृतींमध्ये सक्रिय सहभाग असलेला शाम सुरेश पवार, वय 25 वर्षे, रा. वरवंटी, ता. व जि. लातूर हा सराईत गुन्हेगार सार्वजनिक सुव्यवस्थेस गंभीर धोका ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याने, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे मार्गदर्शनात नमूद आरोपी विरुद्ध एम पी डी ए चा सविस्तर प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी, लातूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता त्यावर जिल्हाधिकारी वर्षा-ठाकूर घुगे यांनी सदर इसमास एमपीडीए अधिनियम, 1981 च्या कलम 3(1) व 3(2) अन्वये एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिनांक 05/02/2026 रोजी निर्गमित केले आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्याने त्यांच्या प्रस्तावामधील सदर इसमाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती, त्याची सातत्यपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्या कृतीमुळे निर्माण झालेली सार्वजनिक भीती, कायदा व सुव्यवस्थेवर झालेला प्रतिकूल परिणाम, तसेच साक्षीदारांच्या जबाब व गोपनीय अहवाल यांचे जिल्हादंडाधिकारी, लातूर यांच्याकडून बारकाईने परीक्षण करण्यात आले. या परीक्षणाअंती असे समाधानकारकपणे निष्पन्न झाले की, सदर इसमाचे कृत्य हे केवळ वैयक्तिक स्वरूपाचे नसून, सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणारे व समाजाच्या शांततेस बाधक आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यास प्रतिबंधात्मक स्वरूपात स्थानबद्ध करणे अत्यावश्यक आहे.
त्याअनुषंगाने, गृह विभाग (विशेष), महाराष्ट्र शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, जिल्हादंडाधिकारी, लातूर यांनी एमपीडीए अधिनियमाच्या कलम 13 मधील तरतुदीनुसार सदर इसमास एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.सदर स्थानबद्धतेच्या अनुषंगाने आवश्यक असलेले स्थानबद्धता आदेश, सुपूर्तता आदेश, स्थानबद्धतेबाबतचे आधारभूत मुद्दे, पोलीस अहवाल, तसेच इतर संबंधित कागदपत्रांच्या प्रती एमपीडीए अधिनियमाच्या कलम 3(3) नुसार शासन मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या आहेत.

निर्गमित आदेशानुसार, सदर इसमास आज दिनांक 08 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी शाम सुरेश पवार, वय 25 वर्षे, रा. वरवंटी, ता. व जि. लातूर ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, हारसूल रोड, छत्रपती संभाजीनगर येथे अधिनियमातील तरतुदीनुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही संपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाई मा. पोलीस अधीक्षक, लातूर श्री.अमोल तांबे, यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.मंगेश चव्हाण, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर श्री.समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चवरे (एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप, सहाय्यक फौजदार भीमराव बेल्लाळे, पोलीस अंमलदार विष्णू वायगावकर, बळवंत भोसले, राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

लातूर पोलीस प्रशासन सार्वजनिक सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता व कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध असून, समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध यापुढेही एमपीडीए कायद्यासह सर्व कायदेशीर तरतुदींचा कठोरपणे अवलंब करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईद्वारे देण्यात येत आहे.

0
0 views