logo

पुणे : महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून कोणतीही तपासणी होत नसल्याने नागरिक थेट पिस्तुल घेऊन येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पाच

पुणे : महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून कोणतीही तपासणी होत नसल्याने नागरिक थेट पिस्तुल घेऊन येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पाच दिवसांपूर्वी झालेल्या महापौर निवडीच्या निवडणुकीत काही पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते चक्क पिस्तुल घेऊन महापालिकेत आले होते. तर शुक्रवारी मिळकतकर विभागात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाने कर्मचाऱ्यांसमोरच पिस्तूल काढत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान संबंधित तरुणाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

महापालिकेती प्रशासकराज संपुष्टात येऊन नवनियुक्त सदस्य महापालिकेत आले आहे. चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिकेत लोकप्रतिनिधी दाखल झाले आहेत. पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या उत्साही कार्यकर्तांची जा-ये मोठ्या प्रमाणात महापालिकेत वाढली आहे. पाच दिवसांपूर्वी महापालिकेत महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काही पदाधिकारी आणि त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क पिस्तुल आणले होते. कमरेला पिस्तुल लावलेले तीन ते चार जण सुरक्षारक्षकांच्या नजरेस पडले होते. मात्र त्यांना हटकण्याची हिंमत कोणीही केली नाही.
महापालिकेत प्रवेश देताना कोणतीही तपासणी केली जात नाही. पिस्तुल, चाकू तसेच इतर धोकादायक असलेल्या गोष्टी अगदी सहजपणे महापालिकेच्या आवारात आणल्या जाऊ शकतात. दररोज कामानिमित्त अनेक नागरिक महापालिकेत येत असतात. यामध्ये ठेकेदारांचाही समावेश असतो. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याची कबुली खुद्द महापालिका आयुक्त नवल किशोर यांनी देखील दिली आहे.

दरम्यान, शुक्रवारी महापालिकेच्या मिळकतकर विभागात कामानिमित्त आलेल्या एका तरुणाने काम होत नसल्याने त्याच्याकडे असलेले पिस्तुल बाहेर काढत स्वत:च्या डोक्याला लावत आत्महत्या करण्याची धमकी दिली. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे महापालिकेत मोठा गोंधळ उडाला.

0
0 views