शनीपेठेत घरात गॅस सिलिंडरचा स्फोट
जळगाव : शहरातील शनीपेठ परिसरातील शनी मंदिराजवळ गुरुवारी, १२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. घटनेत जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शनीपेठ भागात नरेश देवरे यांचे निवासस्थान असून, त्यांच्या घरात सुशांत घोष हे भाडेकरू आहेत. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घोष यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराच्या भिंतींना मोठे तडे गेले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या. घरातील कपडे, संसारोपयोगी वस्तू व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आग अधिक पसरण्यापासून रोखली.