
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इकरा पब्लिक स्कूलचा 'घर घर दस्तक' उपक्रम; शिक्षकांनी घेतली पालकांची भेट
जळगांव १२/०२/२०२६*
(प्रतिनिधी आरिफ खान )
दहावीच्या बोर्ड परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तयारी कशी सुरू आहे आणि त्यांना अभ्यासात कोणत्या अडचणी येत आहेत,याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी इकरा पब्लिक स्कूलने 'घर-घर दस्तक' ही अभिनव मोहीम राबवली आहे.या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अभ्यासाची बारकाईने पाहणी करत असून विद्यार्थी खरोखर मनापासून अभ्यास करत आहेत का,त्यांचे वेळापत्रक कसे आहे आणि त्यांना कोणत्या विषयांत विशेष मदतीची गरज आहे, हे शिक्षक प्रत्यक्ष भेटीतून समजून घेत आहेत.परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांशीच नव्हे,तर त्यांच्या पालकांशीही सविस्तर चर्चा केली आहे."घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण कसे असावे, मोबाईलचा वापर कसा टाळावा आणि मुलांच्या आहाराकडे कसे लक्ष द्यावे," याबद्दल शिक्षकांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले असून पालकांनी देखील शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. शाळेने केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून घेतलेली ही दखल खरोखरच कौतुकास्पद असून,या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे व बोर्ड परीक्षेत शाळेचा निकाल उत्तम लागेल, असा विश्वास मुख्याध्यापक शेख शकील आणि शिक्षकांनी व्यक्त केला असून स्थानिक नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातून या मोहिमेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
=================