
मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून;
६ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. शुक्रवार, ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे पार पडलेल्या या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीसह कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह आमदार सर्वश्री अनिल परब, प्रसाद लाड, भास्कर जाधव, जयंत पाटील, सुनील प्रभु, भाई जगताप, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या कालावधीत शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी असतानाही विधिमंडळाचे कामकाज होणार आहे. मात्र सोमवार, २ मार्च रोजी होळी व मंगळवार, ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने या दोन दिवसांत कामकाज होणार नाही. तसेच गुरुवार, १९ मार्च रोजी गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने आणि शुक्रवार, २० मार्च रोजीही विधिमंडळाचे कामकाज होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात विशेष चर्चा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार, ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला विषयक चर्चा होणार आहे. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेच्या संवर्धन व विकासावर चर्चा केली जाणार आहे. याचबरोबर निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभही अधिवेशन काळात पार पडणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या आर्थिक धोरणांसह विविध सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.