logo

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेचा 'श्रीगणेशा'; सीसीटीव्हीच्या कडक पाळत इंग्रजीचा पेपर संपन्न.

रिसोड: स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आजपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कडक निगरानीत पार पडली.
या केंद्रावर एकूण २०८ विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवत इंग्रजीचा पेपर दिला. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत आणि पारदर्शकता जपली जावी, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक वर्गातील हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते.
केंद्राचे मुख्य अधिकारी श्री. विनोद परसराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सोयी-सुविधा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आणि प्रकाश व्यवस्था उत्तम असल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षक विशेष खबरदारी घेत आहेत. पहिल्या दिवशीची परीक्षा सुरळीत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला असून, पुढील सर्व पेपर अशाच शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

3
289 views