logo

श्रमिक जनतेच्या विविध मागण्यांसाठी मुखेड तहसिल, पंचायत समिती आणि नगरपालिका कार्यालयावर शेतमजूर व इतर ग्रामीण मजुरांचा धडक मोर्चा


चलो मुखेड! चलो मुखेड!! चलो मुखेड!!!
महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा)
मुखेड तालुका समितीच्या नेतृत्वाखाली
श्रमिक जनतेच्या विविध मागण्यांसाठी मुखेड तहसिल, पंचायत समिती आणि नगरपालिका कार्यालयावर
शेतमजूर व इतर ग्रामीण मजुरांचा धडक मोर्चा
* मोर्चाचा दिवस व वेळ : गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वा.
* ठिकाण : बाह्राळी नाका ते तहसिल कार्यालय समोर, मुखेड
मजूर भगिनी आणि बंधूंनो,
दिनांक १२ फेब्रुवारीच्या राष्ट्रव्यापी कामगार संपास युनियनचा सक्रिय पाठिंबा जाहीर करीत आहे. त्याचबरोबर शेतमजूर व इतर ग्रामीण मजुरांच्या खालील मागण्यांसाठी बाह्राळी नाक्यापासून मुखेड तहसिल कार्यालयावर सकाळी ११:३० वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. मुखेड तालुक्यातील सर्व शेतमजूर, शेतकरी व इतर ग्रामीण मजूर यांनी प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चात सामील व्हावे! ग्रामीण मजुरांनो एक व्हा! संघर्षात सामील व्हा! आपले हक्क हिसकावून घ्या.
ग्रामीण मजुरांच्या मागण्या
१. VB-GRAM G 2025 हा ग्रामीण मजूरविरोधी कायदा रद्द करून मनरेगा (MGNREGA 2005) कायदा पुन्हा मजबुतीने लागू करा.
२. मागेल त्या मजुराच्या हातास रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ उपलब्ध करा.
३. घरकुलाची थकीत हप्ते तात्काळ अदा करा, शासनाच्या घोषणेनुसार जिओ टॅगिंग नंतर ८५ टक्क्यांच्या आत पैसे द्या.
४. बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करा व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करा.
५. मागील दोन महिन्यांचे श्रावण बाळ योजना, विधवा, वृद्ध, परित्यक्ता, दिव्यांगांचे निराधार अनुदान तात्काळ वाटप करा.
६. श्रावणबाळ, वृद्ध निराधार, विधवा, परित्यक्ता लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये प्रमाणे मानधनात वाढ करा.
७. शेतकऱ्यांप्रमाणे भूमीहीन शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर सन्मान योजना सुरु करा.
८. ज्या महिलांचे लाडकी बहीण योजना अनुदान बंद केले आहे ते सुरु करा व कुटुंबातील सर्व महिलांना लाभ द्या.
९. लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ३ हजार रुपयांपर्यंत वाढ करा.
१०. रेशनच्या यादीत ग्रामीण मजुरांची व अल्पभूधारक शेतकऱ्यांची नावे शेतकरी यादीतून वगळून त्यांना रेशनकार्ड द्या आणि स्वस्त धान्य दुकानातून रेशन द्या.
११. एकल महिलांची विशेष नोंद घेऊन, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्याकरीता विशेष सामाजिक सुरक्षा योजना जाहीर करा.
१२. मुखेड नगरपालीका अंतर्गत शहरातील मजुरांसाठी रोजगार हमी योजनेचे काम सुरु करा.
१३. फुले नगर, वाल्मिक नगर व बजरंग नगर येथील घरे नगरपालिकेच्या मालकी रजिस्टरमध्ये नोंदवा आणि घरकुल तसेच इतर योजनांचा लाभ द्या.
१४. मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, गाडीवान, फळे व भाजी विक्रेते आणि ग्राहकांसाठी शौचालय व मुतारी उभारा.
१५. कृषी उत्पन्न बाजारसमिती अंतर्गत हमाल-मापाडी व इतर कामगारांसाठी शौचालय-मुतारीची व्यवस्था करा आणि विश्रामगृह बांधा.
१६. जमीन कसणाऱ्या व इतर भूमीहीन शेतमजुरांना गायरान व इतर कसवणुकयोग्य जमिनीचे वाटप करा.
* विनीत *
- रावसाहेब शिंदे. महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लालबावटा) मुखेड तालुका समिती.

36
4406 views