logo

मुंबई महापौर-उपमहापौरपदाची अखेर घोषणा ; भाजपच्या रितू तावडे महापौरपदी, शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी उपमहापौर

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजपच्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर भाजप नेतृत्वाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट) चे नेते संजय घाडी यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून महापौरपदाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका मुख्यालयात हालचालींना वेग
आज सकाळी महापालिका मुख्यालयात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेत्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सत्तेचे अंतिम समीकरण तसेच महापौर व उपमहापौर पदांच्या वाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम व गटनेते गणेश खणकर, तर शिवसेना शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे व गटनेते अमेय घोले उपस्थित होते.
शिंदे गट ठरला किंगमेकर
महायुतीच्या सत्तास्थापनेत शिवसेना शिंदे गटाने निर्णायक भूमिका बजावल्याने उपमहापौरपद शिंदे गटाकडे देण्यात आले. या पदासाठी सुरुवातीला शीतल म्हात्रे व अमेय घोले यांच्या नावांची चर्चा होती. मात्र अखेर संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल (२०२६ निवडणूक निकाल)
मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्तेसाठी आवश्यक असलेल्या ११४ च्या मॅजिक फिगरपेक्षा महायुतीकडे अधिक संख्याबळ आहे.
भाजप : ८९ जागा
शिवसेना (शिंदे गट) : २९ जागा
शिवसेना (ठाकरे गट) : ६५ जागा
काँग्रेस व इतर : २५ जागा
महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम
मुंबई महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडीसाठीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आज ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका मुख्यालयातील सभागृहात विशेष सभा होणार असून दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून मुंबईच्या नव्या महापौर व उपमहापौरांची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

3
1316 views