
राहुरीत आदिवासी महिलांचे उपोषण चिघळले; ‘प्रशासन जागे न झाल्यास महामार्ग रोखू’ – आदिवासी बचाव समितीचा इशारा
राहुरी | प्रतिनिधी : राहुरी तहसील कार्यालयासमोर करजगाव येथील आदिवासी भिल्ल समाजातील महिलांनी सुरू केलेले उपोषण चौथ्या दिवशी अधिकच तीव्र झाले असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बचाव समितीने रविवारी (८ फेब्रुवारी) नगर–मनमाड महामार्ग राहुरी बसस्थानकासमोर अडवण्याचा इशारा दिला आहे.
आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे यांनी सांगितले की, करजगाव येथे आदिवासी भिल्ल समाजातील महिला व पुरुषांवर प्राणघातक हल्ला झाला. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तब्बल तीन दिवसांनी फिर्याद नोंदवली. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी गावात मोकाट फिरत आहेत. त्यामुळे फिर्यादी कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हल्ल्यातील महिलांचे जबाब अद्याप नोंदवले गेले नाहीत. विनयभंग व जीवे मारण्याचा प्रयत्न यांसारखी गंभीर कलमे न लावता केवळ मारहाणीचे कलम लावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शिवाजीराव गांगुर्डे, कैलास माळी, दिलीप बर्डे आणि भास्कर बर्डे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात प्रशासनाने उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बसलेल्या महिलांची कोणत्याही अधिकाऱ्याने साधी विचारपूसही केली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. मागण्या मान्य न झाल्यास रविवारी नगर–मनमाड महामार्ग अडवून तीव्र निषेध नोंदवण्यात येईल, असा इशाराही आदिवासी बचाव समितीने दिला आहे. या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राहुरी पोलिस प्रशासनावर राहील, असे अहिरे यांनी स्पष्ट केले.