प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती; नवी मुंबईत भव्य कार्यक्रम
कोल्हापूर दि. ६ :
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारीस गती देत सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता आदी बाबींची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी दिले.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमांता बिस्वा सरमा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात बैठक झाली.
यावेळी राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, नवी मुंबईचे उपजिल्हाधिकारी तथा कार्यक्रमाचे समन्वयक रविंद्र राठोड, समितीचे शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव तुषार राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तर, दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण, पुणे, नाशिक विभागाचे आयुक्त, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबारचे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक, परिवहन आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी म्हणाले की, नागपूर आणि नांदेड येथील कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थित यशस्वीरित्या झाला आहे. या कार्यक्रमात सिख, सिकलकर,बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकी) संप्रदायासह नागरिकही मोठ्या संख्येने गुरू तेग बहादुर यांचा इतिहासाला उजाळा देण्यासाठी एकत्र येतात. नवी मुंबई येथील कार्यक्रमातही दहा लाख भाविक राज्य तसेच देशातून अपेक्षित आहेत.