वानवडीतील गंगा सॅटॅलाइट येथे थरारक अपघात : फोर्ड इकोस्पोर्ट थेट ओढ्यात कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही
पुणे : वानवडी परिसरातील गंगा सॅटॅलाइट येथे आज सकाळी अकराच्या सुमारास थरारक अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेली फोर्ड इकोस्पोर्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट ओढ्यात कोसळली. अपघाताचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातावेळी वाहनात चालक एकटाच होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
कार ओढ्यात कोसळल्यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार वेगावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या ठिकाणी यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.