logo

सैन्यसेवेतून सन्माननीय निवृत्ती; माजी विद्यार्थ्याचा जनता विद्यालयात सत्कार


पिंपळगाव सराई, दि. ३ फेब्रुवारी २०२६ :
देशसेवेस संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथील माजी विद्यार्थी राजेंद्र वामनराव आरबुने यांची भारतीय सैन्यातून सन्माननीय सेवानिवृत्ती झाल्याबद्दल विद्यालयात माजी विद्यार्थी संघातर्फे सपत्नीक भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शंकरराव तरमळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मला खुर्दे, पर्यवेक्षक संजय पिवटे, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य दीपक गवते तसेच सत्कारमूर्ती राजेंद्र आरबुने व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुवर्णा आरबुने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर शिस्तबद्ध पद्धतीने संगीत कवायत सादर केली. विद्यार्थ्यांच्या नेटक्या आणि प्रभावी सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांकडून विशेष दाद मिळाली.
यावेळी वक्त्यांनी राजेंद्र आरबुने यांच्या दीर्घकालीन, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ सैन्यसेवेचा गौरव करताना ग्रामीण भागातील विद्यार्थीही मेहनत, शिस्त आणि देशभक्तीच्या बळावर उच्च शिखर गाठू शकतात, याचे ते जिवंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले. जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून देशसेवेत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी ही विद्यालयाची अभिमानास्पद परंपरा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. निर्मला खुर्दे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या सर्व घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

43
3181 views