
सेवानिवृत्ती म्हणजे नवीन पर्वाची सुरुवात.............
ॲड.किरणराव सरनाईक.*
*सेवानिवृत्ती म्हणजे नवीन पर्वाची सुरुवात............. ॲड.किरणराव सरनाईक.*
महेंद्र कुमार महाजन
सेवानिवृत्ती हा सेवेचा शेवट नसून नवीन पर्वाची सुरुवात असल्याचे मत ॲड.किरणराव सरनाईक यांनी रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये आयोजित सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रंथपाल बापूसाहेब सरनाईक व सेवक गुणवंतराव सरनाईक यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड.किरणराव सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये स्थानिक शाळा समितीचे जेष्ठ संचालक पंजाबराव देशमुख, जितेंद्रकुमार दलाल, वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे, रिसोड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष साहेबराव जाधव, प्राचार्य दिनकर सरकटे, प्राचार्य सज्जन बाजड, प्राचार्य सावसुंदर, रिठद येथील प्राचार्य विजय ढेंगळे, रिसोड चे प्राचार्य संजय देशमुख, उपप्राचार्य संजय नरवाडे, पर्यवेक्षक गजानन भिसडे, माजी प्राचार्य डॉ.के.बी.देशमुख, शिवाजी मराठी प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन देशमुख, शिवाजी उर्दू प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिस खान, सेवानिवृत्त ग्रंथपाल बापूसाहेब सरनाईक, सेवानिवृत्त सेवक गुणवंतराव सरनाईक व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मंचावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त ग्रंथपाल बापूसाहेब सरनाईक व गुणवंतराव सरनाईक यांचा सपत्नीक शाल-श्रीफळ, साडीचोळी व भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला, तसेच अमरावती विभागीय शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने आमदार किरणराव सरनाईक यांनी या दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. पुढे बोलताना किरणराव सरनाईक म्हणाले की बऱ्याच जणांना असे वाटते की आता आपण सेवानिवृत्त झालो म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या, मात्र सेवानिवृत्ती ही नवीन पर्वाची सुरुवात असल्यामुळे आपल्या सेवेच्या कालावधीत आपण सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी पासून थोडे दुरावलेले असतो आता त्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन समाजासाठी व कुटुंबासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने कार्यरत राहावे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्थानिक शाळा समिती संचालक पंजाबराव देशमुख, वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे यांची समायोचित भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना दोन्ही सत्कारमूर्तींनी आपला सेवेचा काळ कसा गेला यावर प्रकाश टाकला तसेच यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजयराव देशमुख यांनी केले यावेळी प्राचार्य देशमुख यांनी आपल्या सेवा काळामध्ये या दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शाळेची व संस्थेची कशाप्रकारे सेवा केली तसेच आपल्या कामाप्रती सेवाभाव दाखवला त्याबद्दल गौरवोद्गार काढले, कार्यक्रमाचे संचलन डिगांबर पाचरने यांनी केले तर आभार प्रा.विजय देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य दिले.