
"प्रधानमंत्री किसान सन्मान निधी" योजनेच्या निधीत वाढ नाही;
२२ व्या हप्त्याची प्रतीक्षा कायम, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
केंद्र सरकारच्या २०२६ च्या अर्थसंकल्पात 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या तरतुदीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या वर्षातही पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये इतकीच मदत मिळणार आहे.
महागाई आणि शेतीचा वाढता उत्पादन खर्च पाहता, मदतीच्या रकमेत वाढ होईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.
योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो, त्या पार्श्वभूमीवर २२ वा हप्ता फेब्रुवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षीही याच काळात हप्ता जमा झाला होता, त्यामुळे शेतकरी आता फेब्रुवारी अखेरची वाट पाहत आहेत.
शेतकरी संघटनांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत बियाणे,खते,कीटक नाशके आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अशा काळात वर्षाला मिळणारे ६,००० रुपये (प्रत्येकी २,००० चे तीन हप्ते) अत्यंत अपुरे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
अर्थ संकल्पापूर्वी ही रक्कम ९,००० ते १२,००० रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र सरकारने ती फेटाळून लावली आहे.योजनेची आतापर्यंतची वाटचाल अशी आहे.२०१९ मध्ये शेतकऱ्यांना किमान आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू झाली.देशातील सुमारे १० कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे.आतापर्यंत २१ हप्त्यांच्या माध्यमातून ३.७० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
२२ व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी आपले e-KYC पूर्ण असल्याची आणि बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.