अर्थसंकल्पात विकास आत्मनिर्भरता आणि भविष्यनिर्मितीचा आराखडा
डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत भंडारा येथे अर्थसंकल्पावर चर्चा
समीर नवाज भंडारा.
भंडारा : आजचा केंद्रीय अर्थसंकल्प हा गेल्या बारा वर्षांत राबविण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचा एक ठोस, निर्णायक आणि परिणामकारक टप्पा आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अधिक बळ देत देशाचा विकास स्थिर, सक्षम आणि वेगवान करण्याची स्पष्ट दिशा या अर्थसंकल्पातून अधोरेखित होत असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी अभ्यासपूर्ण सांगितले.
भंडारा येथे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सविस्तर चर्चा आयोजित करण्यात आली. यात देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री माननीय श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी, त्यांचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम तसेच ग्रामीण व शहरी विकासाच्या दृष्टीने असलेले महत्त्व यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामध्ये शेती, उद्योग, पर्यटन, रोजगारनिर्मिती, महिला व युवक सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. देशभरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२ लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक करण्याचा निर्णय हा देशाच्या दीर्घकालीन विकासाला नवी चालना देणारा ठरणार आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो, सिंचन, ऊर्जा, आरोग्य आणि कौशल्य विकास या सर्व क्षेत्रांतून रोजगारनिर्मितीला मोठ्या प्रमाणावर गती मिळणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असून, त्याचा थेट लाभ ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत पोहोचणार आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा, कृषी आधारित उद्योग, आरोग्य शिक्षण, कौशल्य विकास तसेच संस्थात्मक क्षमतावृद्धी यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या प्रमुख तरतुदींमध्ये ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी ३७८ कोटी रुपये, ऍग्री बिझनेस नेटवर्कसाठी १६७ कोटी रुपये, इकॉनॉमिक क्लस्टर विकासासाठी २८३ कोटी रुपये, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रमासाठी ३८५ कोटी रुपये, तसेच उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरणासाठी २०७ कोटी रुपये यांचा समावेश आहे. याशिवाय ऍग्री बिझनेस व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ६४६ कोटी रुपये, कौशल्य व मानवी विकासासाठी अनुप्रयुक्त ज्ञान विकासासाठी ३१३ कोटी रुपये, आणि जिल्हा स्तरावरील संस्थात्मक क्षमता वृद्धीसाठी २४० कोटी रुपये इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
शहरी व पायाभूत सुविधा
शहरी पायाभूत सुविधा आणि विकासाच्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी ६,१०३ कोटी रुपये, मुंबई मेट्रोसाठी १,७०२ कोटी रुपये, पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी रुपये, एमयूटीपी–३ (मुंबई) साठी ४६२ कोटी रुपये, एमएमआर क्षेत्र ग्रीन मोबिलिटीसाठी १५५ कोटी रुपये, तसेच महामार्गांवरील इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स (ITS) साठी ६८० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, वेगवान व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी नमूद केले.
या बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे शेतकरी, युवक, महिला, उद्योजक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक आकड्यांपुरता मर्यादित नसून, तो विकास, विश्वास आणि भविष्यनिर्मितीचा मजबूत पाया घालणारा असल्याचे मत सर्वांनी मांडले.