
एकाच वर्षात 28 बलात्काराची नोंद – चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत खळबळ
चिखलदरा :
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, केवळ एकाच वर्षात 28 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आकडेवारीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग असलेल्या चिखलदऱ्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये पीडित महिला आदिवासी, गरीब व असहाय्य वर्गातील असून, त्यांना वेळेवर न्याय मिळतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, पोलीस गस्त, जनजागृती मोहिमा केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात अशा घटना घडत असतील, तर बाहेरून येणाऱ्या महिला पर्यटकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथक, रात्रीची गस्त वाढवणे, जलद न्यायप्रक्रिया, तसेच पीडित महिलांना संरक्षण व समुपदेशन देण्याची मागणी सामाजिक संघटना व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
जर अशाच प्रकारे गुन्हे वाढत राहिले, तर चिखलदरा परिसराची प्रतिमा मलीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता तरी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे