logo

मूकनायक पाक्षिकाची सुरुवात 31 जनवरी 1920 पासुन

*@ ३१ जानेवारी @*
*'मूकनायक' पाक्षिकाची सुरुवात*

'मूकनायक' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायक साठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती. या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकार पर्यंत आणि इतर जनते पर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या.

अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले. सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. 'मूकनायक' पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील ओव्या छापल्या जात असे.
काय करुन आता धरुनिया भीड ।
नि:शक हे तोड वाजविले ।।१।।
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण ।
सार्थक लाजोनी नव्हे हित ।।२।।

20
542 views