
दौंड तहसील, पंचायत समिती व नगरपरिषद कार्यालयांमध्ये आठवड्याच्या शेवटी इंटरनेट बंद – नागरिकांच्या सेवांवर गंभीर परिणाम.
दौंड (ता. दौंड) प्रतिनिधी
दौंड तहसील, पंचायत समिती व नगरपरिषद कार्यालयांमध्ये आठवड्याच्या शेवटी इंटरनेट बंद – नागरिकांच्या सेवांवर गंभीर परिणाम
दौंड (ता. दौंड) प्रतिनिधी –
दौंड तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच नगरपरिषद कार्यालय येथे शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवसांमध्ये वारंवार इंटरनेट सेवा बंद राहत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे शासनाच्या डिजिटल सेवा व नागरिकांच्या अत्यावश्यक कामकाजावर मोठा परिणाम होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारी कार्यालयांतील इंटरनेट सेवा ही केवळ सुविधा नसून ती लोकसेवा हक्क कायदा, ऑनलाईन प्रमाणपत्र सेवा, विविध शासकीय योजना, निधी वितरण, ई-गव्हर्नन्स प्रणाली यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना पुढील समस्यांना सामोरे जावे लागत आहे :
१.जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्रांची कामे रखडणे
२.ऑनलाईन अर्ज व पोर्टल सेवा बंद पडणे
३.नगरपरिषद व पंचायत समितीतील महत्वाची प्रशासकीय कामे थांबणे
४.नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाया जाणे
गंभीर प्रश्न उपस्थित
या संदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत :
इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश आहे काय.?
आदेश नसल्यास ही सेवा बंद राहण्यास जबाबदार अधिकारी कोण.?
सेवा पुरवठादार कंपनीचा दोष आहे की कार्यालयीन दुर्लक्ष.?
नागरिकांच्या हक्कांवर असा अन्याय का केला जात आहे.?
जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाईची मागणी
या प्रकाराची तात्काळ चौकशी करून तहसील कार्यालय प्रमुख, पंचायत समिती प्रशासन, नगरपरिषद मुख्याधिकारी, संबंधित IT प्रभारी अधिकारी व सेवा पुरवठादार यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, तसेच दौंड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेट सेवा सुरळीत ठेवण्याचे तातडीचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
जर यावर त्वरित उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर संबंधित प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार, माहिती अधिकार (RTI) तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.