logo

निशब्द महाराष्ट्र : हातातील घड्याळ उरलं पण वेळ निसटली ...

निशब्द महाराष्ट्र: हातातील 'घड्याळ' उरलं, पण वेळ निसटली !


"अजित पवार" नावाचं एक धगधगतं , शिस्तप्रिय आणि प्रशासकीय वचक असलेलं वादळ जेव्हा एका अपघातात शांत होतं, तेव्हा केवळ राजकारण नाही, तर महाराष्ट्राचं समाजमन डचमळून निघतं.

मानवी शरीर हे कितीही कणखर असलं , भासलं तरी शेवटी तो एक ठिसूळ हाडामासाचा सांगाडा आहे.

ज्या मेंदूमध्ये हजारो राजकीय डावपेचांचा नकाशा होता, ज्या हातांनी लाखो फाईल्सवर राज्याच्या भविष्याच्या सह्या केल्या, त्या हातांची हालचाल निसर्गाच्या एका क्षुल्लक नियमाने कायमची थांबली.

पण या शारीरिक अंतापेक्षाही भयंकर आहे ते या धक्क्यानंतरचं आपलं सामूहिक वागणं आणि आपलं विसरभोळेपणा .

​राजकारणाच्या पटावर अजित पवार म्हणजे एक असा खेळाडू, ज्याने कधीही 'बॅकफूट'वर खेळणं पसंत केलं नाही. पहाटेचा शपथविधी असो किंवा सत्तेची नवी समीकरणं, त्यांच्या निर्णयामागे एक वेगवान राजकीय मेंदू कार्यरत असायचा.

मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर, एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मृत्यू आपल्या मनातील सुप्त भीती जागृत करतो, आपल्याला आपल्या मरणाची भीती वाटते . म्हणूनच आज प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपवर माणुसकीचे फुटलेले पाझर दिसत आहेत.

स्टेटसवर सगळीकडे एकच शब्द दिसतोय— " निशब्द !". सोबतीला "काय घेऊन आलोय अन् काय घेऊन जाणार ?", "माणुसकी जपा, बाकी सगळं शून्य आहे" अशा ओळींचा पाऊस पडतोय.

कालपर्यंत ज्यांच्या स्पष्टवक्तेपणावर टीका होत होती, आज त्याच 'हजरजबाबी' स्वभावातील निर्मळपणा शोधला जातोय. बोलण्याच्या ओघात ते घसरले असतील, शब्दांमुळे आंदोलने झाली असतील, पण त्यांच्यात जी 'प्रशासकीय शिस्त होती, अन लोकांची भिस्त होती… आता त्याचं काय..?

​महाराष्ट्र अशा अनेक धक्क्यांतून सावरला आहे, किंवा खरं तर ते धक्के पचवून पुन्हा 'जैसे थे' झाला आहे.
विलासराव देशमुखांची ती राजबिंडी मुत्सद्देगिरी, गोपीनाथ मुंडेंचा तो लोकसंग्राम आणि आर.आर. पाटलांची ती पारदर्शक माणुसकी—हे सगळे जेव्हा गेले, तेव्हा महाराष्ट्र असाच ढसाढसा रडला होता. पण काय बदललं?

आठवडाभर वैराग्याच्या गप्पा मारणारा समाज आणि राजकारण पुन्हा त्याच चिखलात लोळायला मोकळं झालं.

माणसाची स्मरणशक्ती ही जगातील सर्वात मोठी सोय आणि सर्वात मोठा शाप आहे.

आज जी दुःखाची तीव्रता आहे, ती काही दिवसांत विस्मरणाच्या गर्तेत हरवून जाईल.
व्हॉट्सॲपवर "निशब्द" होणारी माणसं पुन्हा त्याच ताठर भूमिकेत शिरतील. सत्तेच्या स्पर्धेत पुन्हा तेच कुरघोडीचं राजकारण सुरू होईल.
​ज्यांच्या निधनावर आज 'दादा' म्हणून हळहळ व्यक्त होत आहे, त्यांच्या सरणाची राख गार व्हायच्या आत त्यांच्या सत्तेच्या वारसाहक्कासाठी आणि रिकाम्या झालेल्या मतदारसंघासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू होईल.

राजकारणातला हा 'शवविच्छेदनाचा' प्रकार सर्वात जुना आहे.

ज्या माणुसकीचे संदेश आज फॉरवर्ड होत आहेत, तीच बोटं उद्या पुन्हा दुसऱ्याची उणीदुणी काढण्यासाठी नाचू लागतील.

आज 'माणुसकी जपा' म्हणणारे उद्या पुन्हा खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि अहंकारासाठी एकमेकांचे गळे कापायला सिद्ध होतील.

​या भीषण अपघाताच्या गोंधळात जेव्हा त्यांचा मृतदेह ओळखण्याची वेळ आली, तेव्हा नियतीने एक क्रूर काव्य केलं.
तो देह ओळखला गेला तो त्यांच्या हातातील * घड्याळा * वरून. तेच घड्याळ, जे त्यांच्या राजकारणाचं आणि पक्षाचं चिन्ह होतं.
ज्या घड्याळाच्या काट्यावर त्यांनी अख्खा महाराष्ट्र नाचवला, ज्या वेळेची शिस्त त्यांनी प्रशासनाला लावली, त्याच घड्याळाने शेवटी त्यांच्या अस्तित्वाची साक्ष दिली.

पण शोकांतिका हीच आहे की, ज्या घड्याळाने त्यांचा देह ओळखला गेला, त्याच घड्याळाच्या काट्यांसोबत...,
आपण कुणावर तर आणखी जमिनीचे दावे टाकणार, घरं फोडणार, भांडण कशी होतील याच्या संदर्भात काड्या घालणार, जात कशी श्रेष्ठ आहे हे जातीनं सांगणार, घेतलेले पैसे बुडवणार, विश्वासघात करणार, याला बगुन घेतो म्हणणार, त्याला सोडत नसतो म्हणणार , त्याची जिरवणार, बांध फोडणार- कातरणार. क्षुल्लक कारणासाठी वाद घालणार, डोकी फोडणार, कुणाचा तरी ऊस पेटवणार, झाडं उपटणार, वाट अडवणार, घावल ते उचलणार, भेसळ करणार, हप्ते खाणार, टक्केवारी घेणार……
पुन्हा त्याच 'माणुसकीहीन' शर्यतीत धावायला सज्ज होणार…
.
.
आणि परत
कधीतरी
म्हणणार * काय बरोबर न्ह्यायचंय … सगळं हिथंच राहणार..*

प्रवृत्ती बदलत नाही, माणसं विसरतात.
मृत्यूने दिलेला हा संदेश सुद्धा आपण काही दिवसांत विसरून पुन्हा त्याच ताठरपणाने वागणार, हेच आजचं विदारक वास्तव आहे.

आपणही कुणाचा तरी * कामाचा माणूस * बनू हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल.

30
1656 views