logo

महाराष्ट्र शोकसागरात; लोणी ग्रामस्थांकडून अजित दादा पवार यांना अश्रुपूरित श्रद्धांजली.

लोणी प्रतिनिधी: तेजस वाळुंज.

अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून लोणी गाव व पंचक्रोशीमध्ये शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोणी ग्रामस्थांनी सामाजिक भान जपत आठवडे बाजारासह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत आपली भावना व्यक्त केली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था व ग्रामस्थ एकत्र येत लोणी येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात उपस्थितांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक, सामाजिक व राजकीय जीवनातील योगदान आठवत अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. “नेहमी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारा नेता” अशी भावना व्यक्त करत अनेकांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली सभेत माजी सरपंच उद्धव लंके, आंबेगाव तालुका पूर्व मंडल अध्यक्ष किरण वाळुंज, माजी सरपंच दिलीप शेठ वाळुंज, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, सुषमाताई गिरे, वडगाव पीरचे सरपंच संजय पोखरकर, जनकल्याण संस्थेचे संचालक प्रदीप कोचर, बाळशीराम वाळुंज, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष साळुबाई मांजरे, नीलिमा वाळुंज, ऋतुजा आदक आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी लोणी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, समाजभूषण कैलास गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे संचालक चंद्रकांत गायकवाड, लोणी गावचे पोलीस पाटील संदीप आढाव, लोणी बाजारपेठेतील व्यापारी, तसेच लोणी पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण लोणी गावात दिवसभर शांतता पाळण्यात आली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता, हळहळ व अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत होती. या श्रद्धांजली कार्यक्रमातून लोणी ग्रामस्थांनी एकतेचे व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत आपली सामूहिक भावना व्यक्त केली.

0
0 views