logo

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारे ग्रंथ व वृत्तपत्रीय प्रदर्शन

पिंपळगाव सराई (ता. जि. बुलढाणा), दि. २६ जानेवारी २०२६

येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रंथ तथा वृत्तपत्रीय वाचनीय साहित्य प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर उपक्रम विद्यालयाचे प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे व पर्यवेक्षक संजयजी पिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ, चिखलीचे संचालक सुनिलभाऊ लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य विष्णुदत्त त्रिवेदी सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य, ठेवीदार बंधू-भगिनी तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
या प्रदर्शनात विविध विषयांवरील ग्रंथ, वर्तमानपत्रे, मासिके तसेच अन्य वाचनीय साहित्य मांडण्यात आले होते. दिनांक २७ जानेवारीपासून रिक्त तासिकांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांमधील महत्त्वपूर्ण व आशयपूर्ण बातम्यांची शीर्षके आपल्या वहीत नोंदवून वाचन व निरीक्षण कौशल्याचा विकास केला.
या उपक्रमाची संकल्पना सेवानिवृत्त शिक्षक यादवराव सुसर यांची असून त्यांच्या कल्पनेतून हे प्रदर्शन साकारण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या प्रदर्शनाचा लाभ विद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कलाशिक्षक रवींद्र खानंदे तसेच ग्रंथालय प्रमुख दशरथ चिभडे, नितीन शेळके आणि मिनल अवचार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

3
4272 views