
उत्तमचंद बगडीया महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भारतीय लोकशाहीचा गौरवशाली उत्सव असलेल्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रप्रेम, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे औपचारिक व भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी कुंकू व बॅजेस लावून पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करत कार्यक्रमाला मंगलमय वातावरण प्रदान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. उत्तमचंदजी बगडीया साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याला मानवंदना अर्पण केल्यानंतर उपस्थित सर्वांनी सामूहिकपणे राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे गायन केले. यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावना आणि राष्ट्राभिमानाने भारावून गेला. या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. विठ्ठलराव वसु, संचालक मा. श्री. बद्रीनारायणजी तोष्णीवाल, व्यवस्थापक मंडळाचे संचालक मा. श्री. नंदकुमारजी उखळकर व मा. श्री. किशोर शर्मा, तसेच मा. श्री. राधेश्यामजी बगडीया, प्राचार्य मा. डॉ. विनोद कुलकर्णी, मा. डॉ. अजय पाटील, नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती मा. श्री. संजयजी बगडीया, संस्थेच्या संचालिका मा. सौ. सरिता सतीशजी बगडीया, मा. डॉ. गिरीश मनीष बगडीया व मा. श्री. विजेश सतीश बगडीया यांची गरिमामयी उपस्थिती लाभली.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे प्रतिज्ञा ग्रहण समारंभ होय. संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन करण्यात आले. यासोबतच सुजाण, जबाबदार आणि नैतिक नागरिक घडविण्याच्या उद्देशाने साक्षरता शपथ तसेच कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची सामूहिक प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी घेतली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संस्थेचे विश्वासू व कार्यालय प्रमुख मा. श्री. ओंकार पुरी यांचा वाढदिवस अध्यक्ष मा. श्री. उत्तमचंदजी बगडीया साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर विविध शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून गौरव करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य मा. डॉ. विनोद कुलकर्णी यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक व वैचारिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “२६ जानेवारी हा केवळ दिनदर्शिकेवरील दिवस नसून तो आपल्या जिवंत इतिहासाचा, दृढ संकल्पाचा आणि उज्ज्वल भविष्याचा प्रतीक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू होऊन देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उभा राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून आणि संविधान सभेच्या अथक परिश्रमातून साकार झालेले संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून समानता, एकता आणि सामाजिक न्यायाचा मजबूत पाया आहे.”
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. उत्तमचंदजी बगडीया यांनी संविधानाच्या महत्त्वावर सखोल प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आपले संविधान हे केवळ पुस्तक नसून देशाच्या एकता, समानता व न्यायाचे मूर्त स्वरूप आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.” युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी संविधानाचे केवळ पालन नव्हे तर त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी तरुणांवर असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करत, भविष्यात विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. डॉ. किरण बुधवंत, प्रा. प्रमोदकुमार नंदेश्वर, प्रा. जयंत मेश्राम व मा. श्री. ओंकार पुरी यांच्या समन्वयातून करण्यात आले. विविध समित्यांच्या माध्यमातून प्रा. डॉ. अजबराव वानखेडे, प्रा. डॉ. मंगल खेडेकर, प्रा. सुभाष पांढरे, प्रा. संदीप जुनघरे, प्रा. विनोद राऊत, प्रा. पूजा पाठक, प्रा. राम जुनघरे, प्रा. निलेश बाजड, प्रा. अमरदीप साबळे, प्रा. श्वेता बोंडे, सुमित लाव्हरे, प्रा. विठ्ठल वाघ, श्री. संतोष घुगे, श्री. सुनील चरहाटे, श्री. सुरज नरवाडे, श्री. मयूर मगर व श्री. महेश पांडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी केले, तर शेवटी आयोजकांतर्फे प्रा. संजय टिकार यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली