logo

महाराष्ट्रातील १४,२४० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

अमरावती : राज्यातील १४,२४०
ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यापासून संपत आहे. या ठिकाणी पूर्वतयारी नसल्याने निवडणुका लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे येथे १४ ऑगस्ट २०२०च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसे आदेश ग्रामविकास विभागाचे अपर सचिवांनी २३ जानेवारीला काढले आहे.
दरम्यान, या सर्व ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची मागणी सरपंच संघटनांद्वारे होत आहे. मात्र, प्रशासक हा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले

आहे. कार्यकाळ संपुष्टात येणाऱ्या ग्रा.पं. मध्ये प्रभागरचना, आरक्षण व मतदार यादीचा कार्यक्रम झालेला नाही. या सर्व प्रक्रियेला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी अपेक्षित असतो. पूर्वतयारी नसल्यामुळे या सर्व निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुदत संपणाऱ्या ग्रा. पं. मध्ये प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश अपर सचिव वा. म. आसोले यांनी दिले आहे.

सन २०२० मध्ये जुलैपासून पासून प्रभागरचना, तर १ डिसेंबरला प्रारूप यादी व १५ डिसेंबरपासून निवडणूक, १५ जानेवारी २०२१ ला मतदान झाले होते. यंदा मुदत संपुष्टात येत असतानाही प्राथमिक तयारीचे आदेश नाहीत. यापूर्वी मुदत संपलेल्या ग्रा.पं. मध्ये २६ सप्टेंबर १९९४ ते ७ मे १९९५ दरम्यान ग्रामविस्तार अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक नियुक्त करण्यात केले होते.

प्रशासक नियुक्त होणाऱ्या ग्रामपंचायती

ठाणे जिल्ह्यात १५८, पालघर ३, रायगड ८८, रत्नागिरी ४७९, सिंधुदुर्ग ७०, नाशिक ६२१, धुळे २१८, जळगाव ७८३, अहमदनगर ७६७, नंदूरबार ८७, पुणे ७४८, सोलापूर ६५८, सातारा ८७९, सांगली १५२, कोल्हापूर ४३३, छत्रपती संभाजीनगर ६१८, बीड १२९, नांदेड १०१५, धाराशिव ४२८, परभणी ५६६ जालना ४७५, लातूर ४०८, हिंगोली ४९५, अमरावती ५५६, अकोला २२५, यवतमाळ ९८०, वाशिम १६३, बुलढाणा ५२७, नागपूर १३०, वर्धा ५०, चंद्रपूर ६२९, भंडारा १४८, गोंदिया १८९ व गडचिरोली जिल्ह्यात ३६२ ग्रा. पं. वर प्रशासक नियुक्तीची शक्यता आहे

6
700 views