logo

बाळेपिर नगर रोड पुलावर ३५ आवारा कुत्र्यांचा धुमाकूळ; रेबीजचा धोका, लहान मुले व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील बाळेपिर भागात नगर रोडवरील पुलाच्या परिसरात रात्रीच्या वेळेस ३० ते ३५ आवारा कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू असून, हा प्रकार आता थेट जीवघेणा धोका बनला आहे. विशेषतः रेबीजसारख्या प्राणघातक आजाराचा धोका लक्षात घेता, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या मार्गावरून लहान मुले, महिला, विद्यार्थी आणि रात्री कामावरून परतणारे नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र कुत्र्यांच्या टोळ्या अचानक रस्त्यावर धाव घेत असल्याने अपघात, चावा घेण्याच्या घटना आणि गंभीर आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

रेबीज हा आजार प्राणघातक असून, वेळेत उपचार न झाल्यास जीव जाण्याचा धोका असतो. तरीही नगरपालिकेकडून ढिम्म कारभार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नगरपालिकेने तात्काळ स्पेशल ड्राइव्ह राबवून आवारा कुत्र्यांना पकडणे, निर्बीजीकरण व लसीकरण करणे आवश्यक आहे. केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून कठोर पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, प्रशासनाने त्वरित जागे होऊन बाळेपिर नगर रोड पुल परिसरात कडक आणि प्रभावी कारवाई करावी, हीच जनतेची ठाम मागणी आहे.

21
1711 views