
उत्तमचंद बगडीया महाविद्यालयात क्रीडा सप्ताहाचे उत्साहात आयोजन; ११ वीच्या संघाने पटकावले विजेतेपद.
रिसोड: स्थानिक उत्तमचंद बगडीया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक 'क्रीडा सप्ताहानिमित्त' क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बी.ए., बी.कॉम., बी.एससी. तसेच ११ वी आणि १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील एकूण ६ संघांनी आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त खेळ प्रदर्शन केले. चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये इयत्ता ११ वीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ रिबीन कापून आणि श्रीफळ फोडून अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन प्रा. किरण बुधवंत यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. संदीप जुनघरे, वरिष्ठ प्रा. विनोद राऊत, प्रा. पूजा पाठक, प्रा. श्वेता बोंडे आणि कार्यालय प्रमुख श्री. ओंकार पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन केले.
स्पर्धेचे नेटके नियोजन क्रीडा समन्वयक प्रा. राम जुनघरे, प्रा. अमरदीप साबळे, प्रा. निलेश बाजड प्रा.विठ्ठल वाघ आणि श्री. संतोष घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सामन्यांचे विमोचन श्री. संतोष घुगे आणि श्री. सुनील चरहाटे यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी श्री.सुरज नरवाडे,मयूर मगर, महेश पांडे आणि विद्यार्थ्यांनी या सामन्यांचा आनंद घेत खेळाडूंचा उत्साह वाढला.