बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटले लाखोंचे वेतन
जळगाव : बनावट कागदपत्रे करून शासनाची ६ लाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार २२ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम अब्दुल मजीद सालार यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसात उपशिक्षक सय्यद अमरुल्लाह सय्यद चाँद कासार, त्यांचे वडील तथा संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर (दोन्हीरा. जळगाव), सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख नईमोद्दीन शेख अफजलोद्दीन (रा. नशिराबाद), जि.प.चे वरिष्ठ सहायक राजेंद्र रघुनाथ चौधरी व भडगाव उर्दू शाळेचे उपशिक्षक शेख जहीर शेख सलाउद्दीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादीनुसार, अंजुमन-ए-तालिमुल मुस्लेमीन या संस्थेच्या घटनेनुसार पदाधिकारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक त्याच संस्थेत नोकरीवर असू शकत नाहीत. मात्र, उपाध्यक्ष सय्यद चाँद कासार यांनी पदाचा दुरुपयोग करून आपला मुलगा सय्यद अमरुल्लाह याला २०१८ मध्ये शिक्षक म्हणून नियुक्त केले.या नियुक्तीचा मूळ प्रस्ताव प्रलंबित असताना, संशयितांनी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट सही असलेला आदेश तयार केला. या बनावट आदेशाच्या आधारे अनुदानित तत्त्वावर तत्त्व मान्यता मिळवत 'शालार्थ वेतन प्रणाली'मध्ये नाव समाविष्ट केले. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून बनावट कागदपत्रांद्वारे न्यायाल याचीही दिशाभूल करीत लाखो रुपये लाटून शासनाची फसवणूक केली.