
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसानसभेचे राज्यभर आंदोलन; चार दिवसापासून तीव्र आंदोलन.
अलंगुण l प्रतिनिधी:- महाराष्ट्र व गुजरात रस्त्यावरील बोरगाव चौपुलीवर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी किसानसभेचे राज्यभर आंदोलन दखल न घेतल्यास तीव्र बेमुदत आंदोलनाचा इशारा कॉम्रेड जे पी गावित यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, त्याचाच एक भाग म्हणून 17 जानेवारी 2026 रोजी, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील वणी, बोरगाव, सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा मुंडा चौकात बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे, महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयांसमोर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी आमदार कॉम्रेड जे पी गावीत करीत असून, शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तत्काळ आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे, या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या असून, पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर जे पी सिमेंट काँक्रिटसारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खान्देश व मराठवाड्यातील शेतकरी, उद्योगधंदे व औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे, अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे त्वरित पूर्ण करावेत, अशी प्रमुख मागणी आहे, तसेच वनाधिकार कायदा 2006 अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांना द्यावी, स्वतंत्र सातबारा तयार करून पती पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे, इतर हक्क सदरी वनविभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे, अशी मागणी करण्यात आली आहे, वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर यांसह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा, तसेच उर्वरित प्रलंबित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे, यासह शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा, दोन हेक्टरपर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग जसा चाळीस हजार रुपयांचा बोनस देतो, त्याचप्रमाणे वनपट्टा धारकांनाही बोनस द्यावा, पेसा क्षेत्रातील सर्व खात्यांमधील नोकरभरती त्वरित पूर्ण करावी, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांतील कर्मचारी भरती करावी, जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, तसेच शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागण्या आहेत, मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले, दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुंवर, उपनिरीक्षक खाडे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.