
पुण्यात बनावट सह्या करून फसवणूक केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सहा जणांना गुन्हा दाखल
पुणे | प्रतिनिधीरविदासकदम
उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सुनावणीसाठी तक्रारदार व त्यांच्या मुलींच्या बनावट सह्या करून वकिली पत्र सादर केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी ७० वर्षीय सुलाबाई सुदाम पठारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सुलाबाई पठारे यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, हवेली येथून एक समजपत्र प्राप्त झाले होते. एका जमीन प्रकरणाच्या (आर.टी.एस. क्र. ८७१/२०२४) चौकशीसाठी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, सुलाबाई पठारे व त्यांच्या दोन मुलींनी कोणताही अर्ज सादर केलेला नसतानाही, वाडवडिलांच्या जमिनीच्या वाढलेल्या किमतीमुळे पैशांच्या हव्यासापोटी त्यांच्या नावांचा गैरवापर करून त्यांना ‘अर्जदार’ म्हणून दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी वकिलामार्फत सुनावणीला हजर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी संगनमत करून तक्रारदार व त्यांच्या मुलींच्या बनावट सह्या वकिली पत्रावर केल्याचे स्पष्ट झाले. कोणतीही लेखी अथवा तोंडी संमती नसताना कायदेशीर प्रक्रियेत फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी कमलेश काळुराम पठारे, रामदास महादु पठारे, अनिल महादु पठारे, उत्तम कोंडीबा पठारे, सतिश उत्तम पठारे आणि मुरलीधर काशीनाथ पठारे (सर्व रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३६(२), ३४० आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ हांडळ करत आहेत.