
नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्राने अर्थसहाय्य करावे; केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे राज्याची मागणी
शिर्डी, दि. १९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे, अशी विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना करण्यात आली.
राज्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथील कार्यालयात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्याचे जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण) मंत्री गिरीश महाजन, जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव कांताराव, आयुक्त प्रवीण कुमार, विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्यासह राज्याच्या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यामध्ये सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली. या सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत राज्यातील २९ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत ५, विदर्भ पाटबंधारे महामंडळाअंतर्गत ७, कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत ९ आणि गोदावरी विकास महामंडळाअंतर्गत ४ तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत ४ प्रकल्पांची कामे सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यापैकी कृष्णा व गोदावरी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या १३ प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प पूर्ण झाले असल्याची माहिती मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिली.
बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्णा व गोदावरी महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामापैकी १५ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू असून, या दोन्ही योजनांच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढवून ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने दमणगंगा-एकदरे-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, कोकण गोदावरी खोरे, नळगंगा-वैनगंगा, पार गोदावरी या प्रकल्पांच्या कामासाठी अधिकच्या निधीची गरज असून, केंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे-२ प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन यामध्ये पाणीसाठाही होत आहे. डाव्या व उजव्या कालव्यांची कामेही पूर्ण होत आहेत. प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, पाण्याची वितरण व्यवस्था बंदिस्त करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी उपलब्ध व्हावा, अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली. यासाठी २ हजार ३८ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, निधी उपलब्ध झाल्यास बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे ६४ हजार २६० हेक्टर क्षेत्राचे काम जलदगतीने पूर्ण होईल, असा विश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.